हिंगोली : प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीवरून येत्या दोन दिवसांत वादळी वारे व विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
४ सप्टेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व बीड, ५ सप्टेंबर रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर आणि उस्मानाबाद आणि ६ सप्टेंबर रोजी जालना, परभणी, नांदेड, हिंगोली व लातूर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आहे. या दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतातील चालू असलेली कामे थांबवावी. पाऊस व विजांचा कडकडाट सुरू असेल तर यावेळी झाडाखाली थांबू नये. कारण झाडांवर वीज पडण्याची दाट शक्यता असते. पावसादरम्यान, पशुधनाची काळजी घेत त्यांना योग्य ठिकाणी बांधावे, असे आवाहन विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.