हिंगोली : जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी प्रवाशांकडून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे वसमत आगार वगळता दोन तालुक्यांच्या आगारातील मुक्कामी बसेस अजूनही सुरू केल्या गेल्या नाहीत.
मार्च महिन्यापासून कोरोना आजाराने डोके वर काढले होते. एप्रिल ते जुलै या दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार तिन्ही आगारांतील बसेस बंदच होत्या. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील वसमत आगारातून दररोज २६८, हिंगोली आगारातून दररोज १८९, तर कळमनुरी आगारातून दररोज १३८ बसफेऱ्या होत आहेत. कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले असले तरी प्रवाशांकडून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मुक्कामी बसेस बंद केल्या आहेत. जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जांब, पांगरा, तर हिंगोली तालुक्यातील गाडीबोरी, सावरगाव, गांगलवाडी, जयपूर, केंद्रा, तपोवन, शेंदूरसना, ब्राह्मणवाडा, रिसोड, आदी ठिकाणी बसेस लॉकडाऊन आधीपासून मुक्कामी होत्या; परंतु सध्या या ठिकाणच्या मुक्कामी बसेस बंद ठेवल्या आहेत. वसमत आगाराने सर्वच ठिकाणच्या बसेस सुरू केल्या आहेत. प्रवाशांच्या मागणीनंतर बंद असलेल्या मुक्कामी बसेसही सुरू केल्या जातील, असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
प्रतिक्रिया
सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या मार्गावर बसेस
सुरुहिंगोली ते परभणी, हिंगोली ते औरंगाबाद, हिंगोली ते कोल्हापूर, हिंगोली ते सोलापूर या मार्गावर महामंडळाला चांगले उत्पन्न मिळते. हे पाहून महामंडळाने या मार्गावर बसेस सुरू केल्या आहेत; परंतु अजूनही म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही.
प्रतिक्रिया
कोरोना आजाराचे प्रमाण कमी झाले आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील बसेस सुरू केल्या आहेत; परंतु मुक्कामी बस मात्र अजून सुरू केली नाही.
संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली
प्रतिक्रिया
एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये बसेस बंद होत्या. त्यामुळे हिंगोली आगाराचे चार लाख आणि कळमनुरी आगाराचे साडेतीन लाखांचे उत्पन्न घटले गेले.
प्रतिक्रिया
हिंगोली ते रिसोड या मार्गावर पूर्वी मुक्कामी बस होती. आता ही बस बंद झाल्याने प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनावर अवलंबून राहावे लागत आहे. महामंडळाने ही बस सुरू करावी.
-अमोल पाईकराव, प्रवासी
प्रतिक्रिया
कळमनुरी ते पांगरा या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, बस बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. आखाडा बाळापूर येथून पांगरा येथे येण्यासाठी रात्रीला बस नसल्याने पूर्वीप्रमाणे बस सुरू करावी.
-राहुल वाढवे, प्रवासी