कुरुंदा भागात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत असल्याने अनेक जण आपली प्रतिष्ठा पणाला लावून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
कुरुंदा तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे व राजकीय केंद्रस्थान मानले जाते. कुरुंदा ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी सर्वच पक्ष शक्ती पणाला लावतात; परंतु अचानकपणे झालेल्या राजकीय घडामोडींत १७ पैकी १६ जागा बिनविरोध निवडण्यात आल्या. वसमत बाजार समितीचे सभापती राजेश पाटील यांच्या पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. वाॅर्ड क्रमांक ६ मध्ये एका जागेसाठी लढत होत आहे. कोठारी येथे ९ जागांसाठी २५ जण रिंगणात असून, त्यात एक अपक्ष आहे. पार्डी खुर्द येथे ९ जागांसाठी १८ जण उभे असून, या गावात पारंपरिक लढतीचे चित्र उभे आहे. पिंपराळा येथे ९ जागांसाठी १८ जण नशीब अजमावीत आहेत. पिंपराळा येथे दोन पॅनलमध्ये सरळ लढतीचे चित्र आहे. कानोसा येथे ७ जागांकरिता १४ जण रिंगणात असल्याने दोन पॅनलमध्ये सरळ लढत आहे. डोणवाडा येथे ९ जागांपैकी ३ जागा बिनविरोध निघाल्याने ६ जागांसाठी १४ जण रिंगणात आहेत, तर त्यात २ अपक्ष आहेत. कुरुंदवाडीत ७ जागांपैकी १ जण बिनविरोध निघाला, तर १ जागा ओबीसी प्रवर्गातील महिला नसल्याने ती जागा रिक्त आहे. त्यामुळे ५ जागांसाठी ११ जण रिंगणात असून, त्यात एक जण अपक्ष उमेदवार उभा राहिला. दाभडी येथे ७ जागांपैकी ४ जण बिनविरोध निघाल्याने ३ जागांसाठी ६ जण रिंगणात आहेत.
कुरुंदा भागात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने प्रत्येक ठिकाणी निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत. उमेदवार गाठीभेटीवर भर देत आहेत. काही ठिकाणी पॅनल प्रमुख, प्रमुख नेते रिंगणात आहेत. मतदारांना सांभाळताना अनेकांच्या नाकीनऊ येत आहे. मात्र, मतदार टिकवून ठेवण्यासाठी पॅनल प्रमुख प्रतिष्ठा पणाला लावत आहे. निवडणुकीतील चुरस यामुळे वाढणार आहे.