हिंगोली : राज्यभरातील ५ वी ते ८ वीच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी हिंगोली जिल्ह्यात मात्र केवळ काही खाजगी शाळाच सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांना अद्याप मार्गदर्शक सूचना मिळाल्या नसल्याने अजूनही या शाळांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आहे. खाजगी शाळांत मात्र फिजिकल डिस्टन्स व मास्क वापराचे नियम सांगताना शिक्षकांची दमछाक होत आहे.
जिल्हाभरात ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवीच्या ६२९ शाळा आहेत, तर शहरी भागात २८ शाळा आहेत, तसेच ग्रामीण भागातील खाजगी शाळांचा आकडा २४७ असून, शहरी भागात १०९ खाजगी शाळा आहेत. राज्यभरात पाचवी ते आठवीच्या शाळा बहुतांश ठिकाणी सुरू झाल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातही शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी शिक्षकांच्या कोरोना टेस्ट घेत शाळा निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले होते. मात्र, एकाही शाळेला शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे शिक्षक उपस्थित राहत असले तरी जिल्हा परिषदेच्या शाळा अद्याप सुरू झाल्या नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडेही आकडेवारी उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या नसल्या तरी माध्यमिक शाळांना जोडून मान्यता असलेले पाचवी ते आठवीचे वर्ग काही शाळांनी सुरू केले आहेत. मास्कचा वापर व फिजिकल डिस्टन्सचे पालन विद्यार्थी करीत असल्याचे काही शाळांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, यासाठी काही शाळांत दररोज एक वर्ग यानुसार विद्यार्थ्यांना बोलावले जात आहे.
पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असून, सोमवारी ५० टक्के विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना अंतराने बसविले जात असून, मास्क वापराच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यानुसार विद्यार्थीही सूचनांचे पालन करीत आहेत.
-एकनाथ चव्हाण, शिक्षक, दणकेश्वर विद्यालय, आडगाव रंजे.
वर्ग सुरू करण्यापूर्वी पालकांची संमती घेतली असून, संमती घेताना फिजिकल डिस्टन्स व मास्क वापरासंदर्भात सूचना दिल्या आहेत, तसेच दररोज एक वर्ग यानुसार विद्यार्थिनींना बोलावले जात आहे. सोमवारी ३० विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
-गोविंद मुळे, शिक्षक, इंदिरा गांधी कन्या विद्यालय, जवळाबाजार
पाचवी ते आठवीच्या एकूण शाळा
१०१३
एकूण विद्यार्थी
८३६५१
एकूण शिक्षक
७३४०