हिंगोली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंंदिवस वाढत आहे. आजमितीस कोरोना रुग्णांसाठी ९३० बेड्स शहरात उपलब्ध आहेत. रुग्णांची संख्या पाहता हे बेड्स तसे अपुरे म्हणावे लागतील. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शासकीय रुग्णालयात सद्य:स्थितीत ३६० बेड्स असून, ५० रिक्त आहेत, तर एका खासगी रुग्णालयात ५० बेड्स असून १५ रिक्त आहेत. कोरोनाचा कहर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. २१ मार्च रोजी जिल्ह्यात नव्याने ७० रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी ५२ रुग्ण बरे झाले म्हणून त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ७४ वर पोहोचला आहे.
कोरोनाचा वाढता आलेख पाहता जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा रुग्णालयाच्या वतीने वारंवार करण्यात आले आहे; परंतु बहुतांश नागरिक पालन करताना दिसून येत नाहीत. रुग्णांची संख्या वाढली तर उपलब्ध बेड्स कमी पडतील, असे काहींना वाटते. आजघडीला ४९४ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.