हिंगोली : डॉक्टरांचे मूळ प्रिस्क्रिप्शन, रुग्णाचा कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट, सिटी स्कॅन रिपोर्ट व आधार कार्डाची शहानिशा करून रेमडीसीवीर औषधाची विक्री करावी तसेच एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने औषध विक्रेत्यांना दिला आहे.
रेमडीसीवीर हे कोविड रुग्णांसाठी आपत्कालीन वापरास सरकारने मान्यता दिली आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे रेमडीसीवीर इंजेक्शनची मागणी वाढली असली तरी मुबलक साठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. सध्या जिल्ह्यात खाजगी रुग्णालयाशी संलग्न व इतर औषधी दुकानात १५० तर शासकीय रुग्णालयात १०५० इतका साठा उपलब्ध आहे. शिवाय घाऊक विक्रेत्यांनी नागपूर येथील पुरवठादाराकडे मागणी नोंदवली आहे. त्यामुळे रुग्णांनी रेमडीसीवीर इंजेक्शनसाठी अनावश्यक प्रिस्क्रिप्शनची मागणी करु नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
असे आहेत इंजेक्शनचे दर
जिल्ह्यासाठी नागपूर येथून रेमडीसीवीर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे.
रेमडीसीवीर इंजेक्शन विविध कंपनीचे उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार सिप्रिमी इंजेक्शनची एमआरपी किंमत ४ हजार रुपये आहे. तसेच जुबी-आर-इंजेक्शन ४ हजार ७०० रुपये, रेमेविन इंजेक्शन ३ हजार ९६० रुपये, डेसरम इंजेक्शन ४ हजार ८०० रुपये, कोविल्फर इंजेक्शन ५ हजार ४०० रुपये, रामदाक इंजेक्शन ८९९ रुपयांना मिळणार आहे. एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री केल्याचे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. जादा दराने विक्री होत असल्यास परभणी येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयास ०२४५२२३०२१८ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
येथे मिळणार रेमडीसीवीर इंजेक्शन
राजयोग मेडिमार्ट, इंदिरा चौक, हिंगोली यासह अन्य तीन ठिकाणी हे इंजेक्शन मिळणार आहेत.