कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. मागासवर्गीय उमेदवारांनी जात पडताळणी करणे आवश्यक आहे. जात पडताळणीसाठी तहसील कार्यालयात दोन दिवसांत ७४७ उमेदवारांनी प्रस्ताव दाखल करण्यासाठी तहसीलदारांचे शिफारस पत्र नेले आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. गुरूवार व शुक्रवारी ७४७ उमेदवारांनी जात पडताळणीसाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज केले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मागासवर्गीय उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. दाखल प्रस्तावासोबत जात पडताळणीसाठी अर्ज केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे. २३ व २४ डिसेंबर या दोन दिवशी ७४७ उमेदवारांनी जात पडताळणीसाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज केले आहेत. जात पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. त्यासाठी तहसीलदारांचे शिफारस पत्र गरजेचे आहे. हे शिफारस पत्र नेण्यासाठी तहसील कार्यालयात चांगलीच गर्दी दिसून येत आहे. तहसीलदारांचे शिफारस पत्र मिळाल्यानंतर जात पडताळणीसाठी मूळसंचिका जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीकडे उमेदवार सादर करीत आहेत. हे जात पडताळणीसाठीचे शिफारस पत्र देण्याकरिता आर. के. लांडगे, एस. आर. कदम, संजय अमृतवार, मात्रे, फाळेगावकर आदी प्रयत्न करत आहेत. जात पडताळणीचा प्रस्ताव जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीकडे सादर केल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेली पावती उमेदवारी अर्जासोबत जोडली जात आहे.