कळमनुरी: मुंबई येथील लोकलसेवा कोरोना आजारामुळे बंद आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार एस. टी. महामंडळाच्या वतीने परभणी विभागातील ५० बसेस कुर्ला येथे पाठविण्यात येत असल्याची माहिती स्थानक प्रमुख शेख फेरोज यांनी दिली.
११ जानेवारीपासून २१ तारखेपर्यंत या सर्व बसेस परभणी विभागातून कुर्ला येथे जाणार आहेत. परभणी विभागातून मागील दोन महिन्यांपासून चालक व वाहक बोलाविण्यात आले होते. परभणी विभागातील चालक, वाहक व इतर कर्मचारी असे दोनशे कर्मचारी सध्या कुर्ला येथे कार्यरत आहेत. सध्या मुंबई येथे लॉकडाऊन असल्यामुळे तेथील लोकल रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे एसटीकडे प्रवासी संख्या वाढणार आहे. प्रवासी संख्या पाहता परभणी विभागातून चालक वाहक व एसटी बसेस मागण्यात येत आहेत. कळमनुरी आगारातून ३, हिंगोली आगारातून १०, वसमत ७, परभणी १०, जिंतूर ७, गंगाखेड ६, पाथरी ७ अशा एकूण ५० बसेस कुर्ला येथे पाठविल्या जाणार आहेत. लोकल रेल्वे सेवा बंद असल्यामुळे मुंबई कुर्ला येथे जास्त बसेस लागत आहेत. तेथील बसेसमध्ये प्रवाशांची गर्दीही वाढलेली आहे. त्यामुळे आता परभणी विभागातील चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्या व्यतिरिक्त बसेसही मागविण्यात आल्या आहेत.
सध्या कळमनुरी आगारातून ग्रामीण भागासाठी सोडण्यात येणाऱ्या बसेस बंद आहेत. ग्रामीण भागात बसेस नसल्यामुळे अवैध वाहतूक वाढली आहे. ग्रामीण भागात बसेस सोडण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मागील दोन महिन्यांपासून परभणी विभागातून टप्प्याटप्प्याने सर्व चालक-वाहकांना दहा ते पंधरा दिवस कुर्ला येथे ड्यूटी करण्यासाठी पाठविण्यात येत आहे. येथील चालक वाहक व एसटी बसेस कुर्ला येथे पाठविण्यात येत असल्यामुळे येथील आगाराचे उत्पन्न घटतच चालले आहे.