२०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील ७९ शाळांतील ५३० जागांवर वंचित व दुर्बल घटकातील बालकांना मोफत प्रवेश देण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. ५३० जागांसाठी ९८७ अर्ज शिक्षण विभागाकडे दाखल झाले होते. यातून ७ एप्रिल रोजी ऑनलाइन सोडत काढण्यात आली. यात ४७८ जणांची निवड करण्यात आली. या बालकांना शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असताना कोरोनाने सर्वत्र हैदोस घातला होता. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता ११ जूनपासून पुन्हा मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात सुरुवात झाली. आतापर्यंत लॉटरी लागलेल्या बालकांपैकी ३० जणांना तात्पुरता प्रवेश देण्यात आला. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशाकरिता पालकांना प्रवेशाचा दिनांक दिल्यानंतर २० दिवसांचा कालावधी दिला जात आहे. मोफत प्रवेशाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने पालकांतून आनंद व्यक्त केला जात आहे.
चुकीचे अंतर दाखविणाऱ्यांच्या अर्जावर पडताळणी समिती करणार कार्यवाही
प्रवेश अर्ज भरताना अनेक जण चुकीचे अंतर दाखवितात. त्यामुळे निवड यादीतील बालकांबाबत चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास शाळेत तात्पुरता प्रवेश दिला जाणार नाही. अशा पालकांना तालुकास्तरीय समिती, शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार असून पडताळणी समिती आलेले अर्ज व तक्रारीची शहानिशा करून अशा बालकांना प्रवेश द्यावा किंवा देऊ नये, याबाबतचा निर्यण घेणार आहे. मात्र हा निर्णय प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेश सुरू होण्याअगोदर समितीला घ्यावा लागणार आहे. दरम्यान, निवड यादीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचा कालावधी संपल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर सूचना आरटीई पोर्टलवर दिल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले.