हिंगोली : शहरातील नांदेड नाका परिसर, बसस्थानक, मच्छी मार्केट, इंदिरा चौक, हॉटेल व गॅरेज ठिकाणी पथकांकडून बालकामगार शोध मोहीम राबविण्यात आली. यामध्ये १५ बालकामगारांची सुटका २३ डिसेंबर राेजी करण्यात आली आहे.
हिंगाेली शहरात पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात २३ डिसेंबर रोजी ऑपरेशन मुस्कान मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत सापडलेल्या १५ बालकामगारांचे व त्यांच्या पालकांचे जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या वतीने समुपदेशन करुन त्यांची सुटका करून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
या मोहिमेचे आयोजन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, पोलीस उपअधीक्षक आश्विनी जगताप, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही. जी. शिंदे, तसेच जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केले होते. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस जमादार शेख इस्माईल, म.पो.अ. स्वाती डोल्हारे, संरक्षण अधिकारी गणेश मोरे, संरक्षण अधिकारी जरीब खान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्ता सचिन पठाडे, क्षेत्रबाह्य कार्यकर्ता अनिरुद्ध घनसावंत यांनी मोहीम राबविण्यासाठी सहकार्य केले.