देशभरात हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हृदयासंबंधित आजार असलेल्या किमान ८५ टक्के लोकांना हार्ट अटॅक येऊ शकतो. जगभरातील एकूण मृत्यूंपैकी ही संख्या ३२ टक्के आहे. डॉक्टरांच्या मते, हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका हा इतर कोणत्याही वेळेपेक्षा आठवड्याच्या सुरुवातीला जास्त असतो याचाच अर्थ सोमवारी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे.
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर स्वरुपाचा हार्ट अटॅक ज्याला एसटी सेगमेंट एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन किंवा STEMI असं म्हणतात. जेव्हा एखादी प्रमुख कोरोनरी आर्टरी पूर्णपणे ब्लॉक होते तेव्हा असं होतं. विविध रिसर्चनुसार, आठवड्याच्या सुरुवातीला STEMI हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होते, ज्यामध्ये ही संख्या सोमवारी सर्वाधिक असते.
फक्त सोमवारीच का?
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बहुतेक लोकांना हार्ट अटॅक येण्यामागे काही गोष्टी कारणीभूत आहेत.
सर्कैडियन रिदम
तुमच्या शरीराचा सर्कैडियन रिदम किंवा झोपण्या-उठण्याचं चक्र सोमवारी हार्ट अटॅकशी संबंधित असू शकतं. डॉक्टर म्हणतात की, हा रीदम हार्ट अटॅक आणि स्ट्रोकशी संबंधित हार्मोन्सवर परिणाम करतो, त्यामुळे असं घडतं.
स्ट्रेस
बऱ्याचदा स्ट्रेस जाणवत नसला तरी सोमवारी कामावर परतण्याचा स्ट्रेस हा हार्ट अटॅकचं एक प्रमुख कारण ठरू शकतो.
दारू
काही लोक आठवड्याच्या शेवटी जास्त प्रमाणात मद्यपान करतात, ज्यामुळे रक्तप्रवाहात फॅट लेव्हल वाढते. हाय ब्लड प्रेशर आणि त्यानंतर हार्ट फेल्यूअर होतं.
आहार
मित्र आणि कुटुंबासह पार्टी करताना आठवड्याच्या शेवटी जास्त प्रमाणात ट्रान्स फॅट, साखर, प्रक्रिया केलेलं अन्न आणि मीठ असलेला आहार घेतल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.
प्रवास
सोमवारी सकाळी गर्दीच्या वेळी कामावर जात असताना वायू प्रदूषणाच्या संपर्कात येणं आणि स्ट्रेस यामुळे हार्ट अटॅकच्या घटनांचा धोका वाढतो.
फक्त सोमवारच नाही. तर अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते वर्षाच्या इतर कोणत्याही वेळेच्या तुलनेत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हार्ट अटॅकने बहुतेक लोकांचा मृत्यू होतो. तज्ज्ञांच्या मते, दिनचर्या, झोप आणि व्यायामाच्या वेळापत्रकात तसेच आहारात बदल झाल्यामुळे वर्षातील या काळात अनेक लोकांना हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका असतो.
हार्ट अटॅकची लक्षणं
- छातीत दुखणं किंवा छातीत तीव्र दाब जाणवणं
- मळमळ आणि उलट्या
- हात किंवा खांद्यात अस्वस्थता जाणवणं
- पाठ, मान आणि जबड्यात वेदना
- अशक्तपणा जाणवणं
- श्वास घेण्यास त्रास
महिला आणि पुरुष दोघांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं वेगवेगळी असतात, जिथे महिलांना मळमळ, उलट्या, श्वास लागणे आणि पाठ किंवा जबड्यात दुखणं यासारखी लक्षणं जाणवू शकतात. जर तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूच्या कोणाला हार्ट अटॅकची ही लक्षणं जाणवू लागली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अशी घ्या आरोग्याची काळजी
- नियमित व्यायाम करा
- निरोगी आणि संतुलित आहार घ्या
- धूम्रपान न करणं
- मद्यपान न करणं
आरोग्याविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.