#Research : पतीचे आयुष्य वाढविणारा ‘कुंकू’ महिलांचे आयुष्य करत आहे कमी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 13:21 IST
पुरुषांचे आयुष्य वाढावे म्हणून पत्नी आपल्या कपाळावर कुंकू लावते, मात्र हाच कुंकू महिलांचे आयुष्य कमी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
#Research : पतीचे आयुष्य वाढविणारा ‘कुंकू’ महिलांचे आयुष्य करत आहे कमी!
हिंदू धर्मात ‘कुंकू’ला खूपच महत्त्व आहे. पूजा तसेच प्रत्येक शुभ कार्यात याचा वापर केला जातो. विवाहित महिलेच्या आयुष्यात तर कुंकूचे महत्त्व अनन्य साधारण आहे. तिने कपाळावर लावलेले कुंकू म्हणजे तिच्या सौभाग्याची ओळखच असते. याच महत्त्वाला अनुसरुन बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटातही कुंकूचे महत्त्व विषद करण्यात आले आहे. शिवाय बरेच मराठी चित्रपट आणि मालिकांचे कथानकही कुंकू या विषयावरच आधारित आहेत. मात्र आता याच ‘कुंकू’ वर विशेष संशोधन झाले आहे. असे म्हटले जात आहे की, पुरुषांचे आयुष्य वाढावे म्हणून पत्नी आपल्या कपाळावर कुंकू लावते, मात्र हाच कुंकू महिलांचे आयुष्य कमी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अमेरिकेत नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनाद्वारे दावा करण्यात येत आहे की, कुंकूचा रंग लाल व्हावा म्हणून त्यात ‘लीड’ मिसळले जात आहे, जे अतिशय घातक आहे. हे संशोधन अमेरिकन आॅर्गनाइजेशन ‘रुटगर्स स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ’ ने केले आहे. यात अमेरिका आणि भारतातील वेगवेगळ्या दुकानामधून कुंकूचे सुमारे ११८ सॅँपल एकत्र करण्यात आले होते. संशोधनानुसार त्यापैकी सुमारे ८० टक्के सॅँपलमध्ये लीडचे अंश आढळले. हे लीड श्वास घेताना आणि अन्य कारणांनी महिलांच्या शरीरात जाऊ शकते ज्यामुळे श्वासाचे विकार होऊ शकतात, तसेच पोटाचे विकार तर होतातच शिवाय मेंदूवरही विपरित परिणाम होतो. म्हणून महिलांनी कुंकू वापरताना काळजीपूर्वकच वापरावा तसेच लहान मुलांच्याही संपर्कात येऊ देऊ नये. अन्यथा लहान मुलांच्याही आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.