मेयो अधिष्ठात्यांच्या वाहनाची तोडफोड
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
मेयो अधिष्ठात्यांच्या वाहनाची तोडफोड
मेयो अधिष्ठात्यांच्या वाहनाची तोडफोड
मेयो अधिष्ठात्यांच्या वाहनाची तोडफोड-चहाटपऱ्या हटविल्याने उडाला संताप : विदर्भ विकलांग संघर्ष समितीची निदर्शने(फोटो आहे-- मेयो परिसरातील चहा टपऱ्या हटविण्याच्या विरोधात मेयोच्या अधिष्ठात्यांच्या वाहनांची अशी तोडफोड केली.- अधिष्ठाता कार्यालयासमोर निदर्शने करताना विदर्भ विकलांग संघर्ष समितीचे कार्यकर्ते.)नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रसूती वॉर्डाच्या इमारतीलागून असलेले अनधिकृत चहाची व परिसरातील इतरही दुकाने अधिष्ठात्यांच्या आदेशानुसार सुरक्षा रक्षकांनी आज शुक्रवारी हटविले. याच्या विरोधात काही दुकानदारांनी अधिष्ठात्यांच्या वाहनाला लक्ष्य करून प्रचंड तोडफोड केली. यावेळी रुग्णालय परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. विदर्भ विकलांग संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गोपीनाथ बोहत यांचे मेयोच्या प्रसूती वॉर्डाच्या इमारतीला लागून चहाचे दुकान आहे. मागील ३५ वर्षांपासून ते दुकान चालवितात. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बोहत हे अपंग असल्याने मेयो प्रशासन त्यांच्याकडे सहानभूतीने पाहत होते. परंतु तो चहाच्या प्लास्टिक कपाचा कचरा उचलण्याकडे विशेष लक्ष देत नव्हते. त्याने बासबल्लीच्या मदतीने चहाटपरी उभी केली होती. त्याचे पाहून इतरही लोक चहाटपरी लावण्याची मागणी अधिष्ठाता डॉ. प्रकाश वाकोडे यांच्याकडे करीत होते. काहींनी तर ठिकठिकाणी चहाच्या टपऱ्या व इतर दुकानेही सुरू केली होती. परिणामी परिसर अस्वच्छ होत होता. अखेर डॉ. वाकोडे यांनी रुग्णालयाच्या परिसरातील सर्वच अनधिकृत दुकाने हटविण्याच्या सूचना सुरक्षारक्षकाला दिल्या. त्या प्रमाणे आज सकाळच्या सुमारास बोहत यांच्यासह सर्वच दुकाने हटविली. याच्याविरोधात बोहत यांनी विदर्भ विकलांग संघर्ष समितीचे अध्यक्ष गिरीधर भजभुजे यांच्या नेतृत्वात अधिष्ठाता कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जोरदार नारेबाजी केली. वाढता असंतोष पाहता कार्यालयाचे दार बंद करण्यात आली. याचवेळी काहींनी अधिष्ठात्यांच्या सुमो वाहनांवर हल्लाबोल करून प्रचंड तोडफोड केली. याची माहिती मिळताच तहसील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मध्यस्थीने अपंगांचे शिष्टमंडळ डॉ. वाकोडे यांना भेटले. चहाटपरीसाठी २०० स्केअर फुटाच्या जागेची मागणीचे निवेदन दिले. याावर डॉ. वाकोडे यांनी संबंधित मागणी वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी गिरीधर भजभुजे यांच्यासह गोपीनाथ बोहत, उमेश गणवीर, शफीक शहा, विजय निखाडे आदी पाच जणांवर कारवाई केली.