- माधुरी पेठकरसकाळी 6 वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत कुठल्या ना कुठल्या कामाच्या मागे पळत असतो. घर आॅफिस घर हे चक्र माणसाला दिवसाचे 17 ते 18 तास राबवून घेतं. या रूटीनमुळेच लवकर थकायलाही होतं. नेमक्या याच कारणामुळे दोन दिवसांची छोटी सुट्टी का असेना तिचा फायदा घेत अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. छान फिरून वगैरे होतं. पण त्या सुट्यांचा उपयोग आरामासाठी होतो का? कारण सुट्यांवरून आले तरी अनेकांची झोप न होण्याची तक्रार तशीच शिल्लक असते. सुट्यांमध्ये खूप फिरलो, गप्पा मारल्या, मस्त खाणंपिणं एन्जॉय केलं... असं सगळेच मजेनं सांगतात. पण आराम आणि झोपेचं काय? हे विचारलं की ‘तो कसला होतो?’ असं मोघम उत्तर मिळतं.रोजच्या रूटीनमध्ये झोपेचं बारगळलेलं वेळापत्रक रूळावर आणायचं असेल तर सुट्टीसारखी दुसरी चांगली संधी नाही. सुट्टीमध्ये बिघडलेल्या झोपेच्या सवयीला योग्य शिस्त लावली तर सुट्टी संपून आपण जेव्हा कामाला लागतो तेव्हा आपण फुल चार्ज झालेलो असतो. आणि या ताळ्यावर आलेल्या झोपेला केंद्रबिंदू करून आपण आपल्या रोजच्या कामाचं नवीन वेळापत्रक बनवू शकतो.खूप नव्हे पण चांगली झोप झालेली असणं हे आरोग्याच्या आणि कामातील आनंदाच्या दृष्टिकोनातून चांगलं असतं. ही चांगली झोप आपल्या वाट्याला यायची असेल तर मस्त तीन चार दिवस सुट्टी घेवून बाहेर फिरायला जा आणि परत येताना आपली सुधारलेली झोप घेवून परत या.
सुट्टीत झोपेला शिस्त... हे करा
* बाहेर फिरायला गेल्यावर झोपेचं वेळापत्रक पाळा. चुकीच वेळापत्रक असेल तर ते बदलून नवीन आखून पुरेपूर झोप घ्या. बाहेर फिरायला गेल्यावरही एरवीप्रमाणे रात्रीची झोप महत्त्वाची असते. त्यामुळे रात्री वेळेत झोपण्याची शिस्त पाळावी. रात्री दहा वाजता रूममधले लाइट, पडदे बंद करून झोप येत नसली तरी पडून राहावं. थोड्यावेळानं झोप येतेच. असं सुट्टी दरम्यान तीन चार दिवस केल्यावर झोपेलाही ठरवलेल्या वेळेची सवय लागते.* दिवसभर कुठेही कितीही भटका पण रात्री झोपायची वेळ पाळाच. झोपायच्या दोन तास आधीच जेवण करावं.* झोपायच्या दोन तास आधी जेवढं जेवण महत्त्वाचं तितकंच झोपायच्या दोन तास आधी सर्व प्रकारचे स्कीन ( टी.व्ही, मोबाईल, कम्प्युटर) बंद करावेत. अनेकजण बाहेर फिरायलास गेल्यावर काय पण एरवीही अगदी झोपण्यासाठी बेडवर गेल्यावरही हातातल्या स्क्रीनशी खेळत राहातात. पण यामुळे झोपेच्या संबंधित हार्मोन्सवर नकारात्मक परिणाम होतो आणि झोप उडते. ही सवय तोडायची असेल तर सुट्टी ही चांगली संधी आहे. त्यासाठी रात्री झोपायला जाण्याच्या दोन तास आधी स्क्रीन बंद करावेत.* स्क्रीन ऐवजी पुस्तक सोबत ठेवावं. पुस्तक वाचून झोपल्यास नवख्या ठिकाणीही शांत झोप येते.* सुट्टी आहे म्हणून मग कितीही वेळ झोपावं किंवा आली दुपारी झोप तर चांगलं दोन तीन तास झोपावं हे करणं टाळावं. याउलट कंटाळा आलाय, डुलकी घेवूशी वाटतेय तर मग फक्त दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान एक दहा मीनिटं झोप घ्या. त्यापेक्षा जास्त नको. नाहीतर रात्रीच्या झोपेला शिस्त लावणं जमायचं नाही.* सुट्टीत मजेसोबतच व्यायाम आणि फिटनेसकडेही बघावं. उलट एरवी व्यायाम करत नसल्यास ही सवय सुट्टीच्या सवडीत नवीन ठिकाणी लावून पाहावी. आपण राहातो त्या हॉटेलात जीम असेल तर जीमला जावून पाहावं. स्विमिंग पूल असेल आणि पोहता येत असेल तर थोडा वेळ पोहावं. नाहीतर आजूबाजूच्या नजार्याची मजा घेत मस्त फेरफटका मारावा. यामुळे मेंदूला छान रिलिफ मिळतो आणि शरीराला आवश्यक असलेला थकवाही. या गोष्टी झोपेसाठी अतिशय उपयोगी पडतात.अशा प्रकारे सुट्टी घेवून कुठे आउटिंगला जात असाल तर मौजमजा यासोबतच आपल्याला झोपेला नवीन शिस्त लावायची आहे हे ही डोक्यात ठेवावं. आणि या नवीन गोष्टी ज्या तुम्ही बाहेर करू शकतात त्या घरी परत आल्यावरही चालूच ठेवायच्या म्हणजे झोप ताळ्यावर आलीच म्हणून समजा.