HEALTH : रक्तातील साखरेची पातळी कशी ओळखाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 15:08 IST
रक्तामधील साखर ही आपल्या शरीराला, आपल्या शरीरकोषांना अनुकूल असतेच, मात्र खाण्याच्या विपरित सवयींमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होते आणि शरीरात विकृती निर्माण होते.
HEALTH : रक्तातील साखरेची पातळी कशी ओळखाल?
-Ravindra Moreसध्याच्या आधुनिकीकरणामुळे प्रत्येकाची जीवनशैली झपाट्याने बदलत आहे. याचाच परिणाम शारीरिक आरोग्यावर दिसून येत असून विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातीलच एक म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त असणे होय. रक्तामधील साखर ही आपल्या शरीराला, आपल्या शरीरकोषांना अनुकूल असतेच, मात्र खाण्याच्या विपरित सवयींमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त होते आणि शरीरात विकृती निर्माण होते.कशी होते विकृती सेवन केलेल्या अन्नापासून तयार होणारी साखर ही शरीरकोषांना उर्जा म्हणून सातत्याने एका सम प्रमाणात मिळत राहायला हवी. तेव्हाच शरीरकोष अर्थात शरीर त्याची विविध जैवरासायनिक कार्य विनासायास पार पडू शकेल. दुर्दैवाने काही जणांच्या शरीरात रक्तामध्ये साखरेची सम पातळी राहात नाही. त्यांच्या रक्तामध्ये साखर खूप जास्त वाढते आणि मग एकदम कमी होते. साखरेचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने शरीरकोषांना उर्जादेखील कमी जास्त मिळत राहते आणि त्यानुसार त्यांना विशिष्ट लक्षणे त्रस्त करत राहतात. या अवस्थेमध्ये त्या मंडळींना आपल्या रक्तामध्ये साखर सम पातळीत राहत नाही आहे, हे लक्षात आले तर पुढच्या विकृती टाळता येतील. कारण हेच लोक पुढे जाऊन वजनदार शरीराचे व आळशी बनतात. आपल्या शरीरातही असे काही घडत आहे, हे आपणास कसे ओळखता येईल? त्यासाठी खाली काही प्रश्न दिले आहेत. १. सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटत नाही का?२. झोपेतून उठल्यावरसुद्धा आळसावल्यासारखे किंवा पुन्हा झोपावेसे वाटते?३. काय सकाळी उठल्यानंतर तुम्हाला चहा-कॉफी प्यायल्याशिवाय उत्साह वाटत नाही?४. तुम्हाला दिवसभरातून अनेकदा आळसावल्यासारखे वा झोपावेसे वाटते, विशेषत: जेवल्यानंतर?५. अंगात उर्जा नाही म्हणून तुम्हाला व्यायाम करावासा वाटत नाही?६. काय तुम्हाला मन एकाग्र करताना नेहमीच त्रास होतो?७. तुम्हाला डोकेदुखीचा त्रास वारंवार होतो?८. वेळेवर जेवण मिळाले नाही की तुम्हाला चीडचीड होते?९. काय सहा तास अन्न मिळाले नाही तर तुम्हाला गळून गेल्यासारखे वाटते? यापैकी जर निम्म्यापेक्षाही जास्त प्रश्नांची उत्तरे होय असतील तर आपल्या रक्तातील साखरेची पातळी सम पातळीत राहत नाही, असे समजावे. कदाचित तुम्हाला रक्तशर्करा असात्म्यता विकृतीचा त्रास असण्याची शक्यता आहे. मात्र आळसामुळेही वरील लक्षणे दिसू शकतात, हे विसरु नका.