आशियाई देशांसह भारतात कोरोनाचे रुग्ण अचानक सापडू लागले आहेत. दोन वर्षांपूर्वी गायब झालेला कोरोना पुन्हा परतू लागला आहे. दिल्लीत अतिरिक्त बेड तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यांत कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोना लसीमुळे मिटलेली भारतीयांची चिंता पुन्हा वाढू लागली आहे. अशातच या वाढत्या रुग्णांच्या संख्येने कोरोना का पसरू लागल्याची कारणे शोधण्यास भाग पाडले आहे.
२०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा कोरोना आला होता, तेव्हा मोठी खळबळ उडाली होती. नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन लावण्यात आला होता. यामुळे नोकरी, धंद्यासाठी या राज्यातून त्या राज्यात गेलेले किंवा प्रवासी मजूर म्हणून ओळखले जाणारे लोक मिळेल त्या वाटेने, शेकडो किमी चालत आपापल्या गावी पोहोचले होते. यावेळी अनेकांचा मृत्यूही झाला होता. शिवाय कोरोनाच्या अस्पृष्यतेने अनेकांना गावातही घेतले गेले नव्हते. गावाच्या बाहेर किंवा निर्जन ठिकाणी क्वारंटाईनही केले जात होते. कोरोनाची लस आली आणि हा कोरोना नियंत्रणात आला होता. गेल्या काही वर्षांत तो समूळ नष्ट झाला किंवा सामान्य सर्दी-पडशासारखा झाल्याचे वाटत होते.
परंतू, हाँगकाँगसारख्या देशांत रुग्ण सापडू लागल्यानंतर आठवडाभरातच भारतातही रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. टाईम्स ऑफ इंडियानुसार मुंबईत ९५ रुग्ण सापडले आहेत. जानेवारीपासून महाराष्ट्रात १०६ रुग्ण सापडले आहेत. सध्या १६ जण उपचार घेत आहेत. यामुळे आरोग्य प्रशासनाने श्वासाचा त्रास होत असलेल्या लोकांची टेस्टिंग सुरु केली आहे.
कोरोना पुन्हा पसरू लागण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची वाढती संसर्गजन्यता आणि लोकांची हळूहळू कमी होणारी प्रतिकारशक्ती कारणीभूत आहे. आधीच्या कोरोना लाटेत लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, तसेच लसीकरणामुळे आधीच ते विषाणूच्या संपर्कात आले होते. यामुळे लोकांमध्ये तयार झालेली प्रतिकारशक्ती ही हळूहळू कमी होऊ लागली आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याचे सांगितले जात आहे.