लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा तालुक्यात मिळून आलेल्या सात बाधितांना डिस्चार्ज देण्यात आल्याने दिलासादायक स्थिती असतानाच २९२ चाचण्या घेऊनही जिल्ह्यात गुरुवारी (दि. ९) नवीन बाधितांची भर न पडल्याने दिलासा मिळाला आहे. यामुळे आता जिल्ह्यात दोन ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, आता ओमायक्रॉन या नव्या विषाणूने दहशत माजवली असल्याने नागरिकांनी खबरदारीने वागणेच हिताचे आहे.अवघ्या देशातच कोरोना नियंत्रणात आलेला असताना, जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. मागील वर्षापासून सुरू असलेला कहर यंदा नियंत्रणात होता. मात्र, आता कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूने दहशत माजवली आहे. त्यातच तिरोडा तालुक्यात एकदम सात बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातही दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर, आमगाव तालुक्यात एक बाधित आढळून आला होता. शिवाय, बुधवारी (दि. ८) अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एक बाधित आढळून आला होता. मात्र, तिरोडा तालुक्यातील ७ रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर आता जिल्ह्यात दोन ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.जिल्ह्यात घेण्यात आलेल्या २९२ चाचण्यांमध्ये एकही बाधित आढळून आला नसल्याने दिलासादायक स्थिती आहे.
लसीकरणाशिवाय पर्याय नाही- कोरोनाची लस गंभीर संसर्गापासून वाचवित असल्याने लसीकरणाशिवाय पर्याय नाही. यामुळेच जिल्ह्यात लसीजोकरण मोहीम मात राबविली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४,८२,१२२ डोसेस देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही कित्येक नागरिकांनी लस घेतलेली नाही, तर कित्येकांनी त्यांचा दुसरा डोस टोलवला आहे. लस घेतलेल्यांना कोरोनाचा गंभीर संसर्ग होत नसल्याने कोरोनापासून बचावासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे.
चाचण्या वाढविण्यात आल्या- जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याने चाचण्यांची संख्या कमी करण्यात आली होती. मात्र, आता ओमायक्रॉनचा प्रसार बघता, जिल्ह्यात चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. मंगळवारी ४६१ चाचण्या घेण्यात आल्या असून, यामध्ये आरटीपीसीआर ४०१ तर रॅपिड अँटिजन ६० चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर बुधवारी २९२ चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये १५८ आरटीपीसीआर तर १३४ रॅपिड अँटिजन चाचण्या आहेत.