सालेकसा : शेतकऱ्यांच्या पडीत जमिनीला उपजाऊ करण्याकरिता पाणलोट व्यवस्थापनाचे उपक्रम वरदान ठरत आहे. ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थितीने कमकुवत असलेले शेतकरी आपली पडीत जमीन सुपिक करण्याकरिता असमर्थ आहे. त्यामुळे त्यांचे जिवनमान पुन्हा खालावत जाते. त्या कमकुवत घटकातील शेतकऱ्यांच्या २० हेक्टर पडीत जमिनीला उपजाऊ करण्याचे काम या उपक्रमातून साध्य करण्यात येत आहे.केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालय भुसंसाधन विभागामार्फत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला. सालेकसा तालुक्यात सदर उपक्रम राबविण्याकरिता श्री गणेश ग्रामीण विकास संस्था गोंदिया यांनी जबाबदारी पार पाडली. संस्था सचिव विजय बहेकार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात या उपक्रमाला पूर्ण करण्याकरिता गावपातळीवर पाणलोट व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली. उपक्रमाला यशस्वी करण्याचे आवाहन गावकऱ्यांनी केले. आधुनिक व तांत्रीक पध्दतीने शेती करून कमीत कमी खर्चातून जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा माणस व आधुनिक पध्दतीने शेती करण्याची शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. आधुनिक व तंत्रशुध्द पध्दतीने शेती करून अधिक उत्पन्न कसे मिळविता येईल? याची जाणीव अनेक शेतकऱ्यांना राहात नाही. यासाठी श्री गणेश पाणलोट व्यवस्थापन समिती नानव्हाच्या वतीने नानव्हा येथे कृषी ग्रंथालयाची सुरूवात करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांना तांत्रीक पध्दतीने शेती कशी करता येईल, शेती व्यवस्थेबद्दल व विविध पिकांच्या लागवडीबद्दल पिकाच्या संवर्धनाविषयक, संपूर्ण माहिती असलेल्या पुस्तिका कृषी ग्रंथालयात एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याने त्याचा लाभ गावातील अनेक लोक घेत आहेत. शेती करण्याची पध्दती बदलून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवित आहेत. विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षाचे पुस्तक संच या ग्रंथालयात उपलब्ध असल्याने विद्यार्थी वर्ग सुध्दा या ग्रंथालयाचा लाभ घेत आहेत. कृषी ग्रंथालयातील पुस्तकांमुळे विशेष लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सुधारीत पध्दतीने व्यापक प्रमाणात जोमाने शेती करण्यास सुरूवात केल्याने त्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर घालण्याचे काम पाणलोट समितीने केले आहे. (वार्ताहर)
पडीत २० हेक्टरमध्ये उत्पन्न घेणार
By admin | Updated: August 4, 2014 23:49 IST