कृषी विभाग : पीक कापणी प्रयोगाचा आधारकपिल केकत - गोंदियापावसाच्या लहरीपणामुळे यंदाचा खरिपाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचा ठरला. पावसाच्या खेळीमुळे यंदा खरिप हंगाम शेतकऱ्यांसाठी समाधानाचा नसला तरीही मागील वर्षाच्या तुलनेत अधिकचे उत्पादन देणारा राहणार आहे, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. कृषी विभागाने केलेल्या ३०० पैकी २१९ प्रयोगांत तीन लाख ३५ हजार मॅट्रीक टन उत्पादनाची शक्यता दिसून आली आहे. उर्वरीत ८१ प्रयोगांत उत्पादनाचे प्रमाण वाढणार असून सुमारे चार लाख मेट्रीक टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. धानाचे कोठार म्हणून गोंदिया जिल्ह्याची राज्यातच नाही तर देशपातळीवर ओळख आहे. येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक धान असून त्यामुळे जिल्ह्यात धानाची भरभराट असते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे ‘कभी खुशी-कभी गम’ च्या परिस्थितीचा सामना येथील शेतकऱ्यांना करावा लागतो. यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांना काही प्रमाणात डोकेदुखीचा सामना करावा लागला. पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली व त्याचा परिणाम उत्पादनावरही जाणवण्याची भिती व्यक्त केली जात आहे.यंदा जिल्ह्यात एक लाख ८८ हजार ९७६ हेक्टर क्षेत्रात खरिपाची लागवड करण्यात आली. जिल्ह्यात धान उत्पादनाच्या या घडामोडीवर लक्ष ठेवत कृषी विभाग येणाऱ्या उत्पादनाचा आढावा घेत राहते. विशेष म्हणजे कृषी विभागाचा संपूर्ण कारभार धानाऐवजी तांदळावर चालत असल्याने ते जिल्ह्यातील तांदळाच्या उत्पादनावर लक्ष लाऊन राहतात. यासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यांत कृषी विभाग, महसूल विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग पीक कापणी प्रयोग करतात. या प्रयोगांत २७.३० क्विंटल दर हेक्टरी धानाचे तर १८.८४ क्विंटल दर हेक्टरी तांदळाचे उत्पादन होऊ शकते असा अंदाज दिसून आला आहे. या आधारे जिल्ह्याचे उत्पादन बघितल्यास तीन लाख ३५ हजार ३६० मेट्रीक टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज बांधला जात आहे. ८१ प्रयोग अद्याप झालेले नसल्याने त्यांचा अंदाज धरल्यास यंदा जिल्ह्यात सुमारे चार लाख मेट्रीक टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. एकीकडे पावसाच्या लहरीपणामुळे खरिपाचा हंगाम हातून गेल्याचे शेतकरी बोलत आहेत. तर कृषी विभागाने चार लाख मेट्रिक टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे आता खरे चित्र काय असणार ते प्रत्यक्षात उत्पादन हाती आल्यावरच स्पष्ट होणार आहे.
यंदा जिल्ह्यात चार लाख मेट्रिक टन तांदूळ उत्पादनाचा अंदाज
By admin | Updated: December 1, 2014 22:55 IST