लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नेपाळ आणि पंजाब येथे गेलेले ८ मजूर मागील चार दिवसांपासून लखनौ आणि पंजाबमध्ये अडकले आहेत. त्यांना अन्न पाणी सुध्दा मिळत नसल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. गावाकडे परत येण्यासाठी कुठल्याही साधनाची सोय नाही. तेथील स्थानिक नागरिक देखील त्यांना सहकार्य करीत नसल्याने त्यांची अडचण निर्माण झाली आहे. महाराष्टÑ सरकारने आम्हाला परत येण्यासाठी काहीतरी मदत करावी अशी याचना त्यांनी केली आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. रेल्वेसह सर्वच वाहतूक बंद करण्यात आली आहे.तर जिल्हा आणि राज्याच्या सीमा सुध्दा सील करण्यात आल्या आहे. त्यामुळे बाहेरील राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर अनेक रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर अडकले आहेत. प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील सोनेगाव येथील नेतलाल कोसरे, शांतीलाल कोसरे, जितेंद्र कोसरे,निखील कोसरे, संदीप कोसरे हे नेपाळ येथे मजुरीसाठी गेले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नेपाळ सरकारने सुध्दा तेथील बाहेरील मजुरांना आपल्या गावाकडे परत जाण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे हे सर्व पाचही जण नेपाळवरुन निघाले. मात्र याच दरम्यान देशात लॉक डाऊन करण्यात आल्याने ते उत्तर प्रदेशातील लखनौ येथे अडकले आहेत. आता त्यांना रेल्वे स्थानकावरुन सुध्दा जाण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर अशीच परिस्थिती पंजाब येथे काम करण्यासाठी गेलेल्या दिलीप तेजराम मेश्राम, रजनीकांत रहांगडाले,चक्रधर कोसरकर यांची झाली आहे. ते सुध्दा गावाकडे परत येत असताना पंजाबमधील संडारसी, तालुका राजापुरा येथे अडकले आहे. ते एका केमिकल कंपनीत काम करण्यासाठी गेले होते. मागील तीन दिवसांपासून त्यांनी संडारसी एका नागरिकाच्या घरी आसरा घेतला होता. मात्र आता त्यांनी सुध्दा जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर राहण्याचा आणि अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्वांनी आम्ही मोठ्या बिकट परिस्थितीत अडकलो असून महाराष्टÑ सरकारने आम्हाला काही उपाय योजना करुन गावाकडे परत येण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना माजी आ.दिलीप बन्सोड यांच्याशी संपर्क साधून मदतीची मागणी केली आहे.........बन्सोड यांचे गृहमंत्र्यांना साकडेतिरोडा येथील आठ मजूर लखनौ आणि पंजाब येथे मागील चार दिवसांपासून अडकले आहे.त्यांना परत येण्यासाठी कुठल्या वाहनाची सोय नसल्याने राज्य सरकारने त्यांना परत आणण्यासाठी काही तरी उपाय योजना करावी, अशी मागणी त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधून केली असल्याचे माजी आ.दिलीप बन्सोड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
Corona Virus in Gondia; लखनौ व पंजाबमध्ये अडकले गोंदियातील तिरोड्याचे मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 14:31 IST
जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नेपाळ आणि पंजाब येथे गेलेले ८ मजूर मागील चार दिवसांपासून लखनौ आणि पंजाबमध्ये अडकले आहेत. त्यांना अन्न पाणी सुध्दा मिळत नसल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे.
Corona Virus in Gondia; लखनौ व पंजाबमध्ये अडकले गोंदियातील तिरोड्याचे मजूर
ठळक मुद्देराज्य सरकारकडे मदतीसाठी साकडेचार दिवसांपासून संकटात