अर्जुनी-मोरगाव : जागतिक जल दिन आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व स्वच्छता सप्ताह निमित्ताने जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन आणि ‘ऊमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्तवतीने २० मार्च रोजी येथे जल संवर्धनाची शपथ घेण्यात आली. यामध्ये पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता व स्वच्छता यावर विविध उपाय करणाऱ्या साहित्यांचे वितरण करण्यात आले. शुध्द पिण्याच्या पाण्याची योग्य पध्दतीने वापर आणि स्वच्छता याबाबत जागरूकता करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाव्दारे १६ ते २२ मार्च या कालावधीत जनजागृती करण्यात येत आहे. यांतर्गत उमेद अभियानातील स्वयं सहायता गटाव्दारे शुध्द पाण्याच्या संवर्धनाचा जागर करण्यात आला. महिलांना पाण्याचे महत्व समजावून सांगण्यात आले. पाणी आणि महिलांचा जवळचा संबध कसा आहे, याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच शौचालयासाठी स्वयं सहायता गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन बांधकाम करता येत असल्याबाबत माहिती देत स्वच्छ भारत मिशनचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तर गटाच्या साप्ताहिक बैठकीदरम्यान जल प्रतिज्ञा घेण्यात येणार असून याव्दारे शुध्द पाण्याचा व स्वच्छतेचा जागर करण्याचा निर्धार महिलांनी घेतला आहे. (तालुका प्रतिनिधी)
महिलांनी घेतली जल संवर्धनाची शपथ
By admin | Updated: March 23, 2015 01:38 IST