बोंडगावदेवी : गावपातळीवरील महिलांनी संकुचित विचार अंगी बाळगू नये, कुटुंबातील एक सुशिक्षित संस्कारित महिला उज्ज्वल दिशा देऊन अख्ख्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास करण्याची किमया करू शकते. चार भिंतीच्या बाहेर निघून विधायक अशा सामाजिक कार्यात नि:संकोचपणे पुढे येण्याचे धाडस करावे, असे प्रतिपादन सरपंच प्रतिभा बोरकर यांनी केले.
येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात जन शिक्षण संस्था गोंदियाच्या वतीने कौशल विकास आणि उद्योग मंत्रालय दिल्ली यांच्या निर्देशानुसार स्वच्छता पंधरवाडा व वृक्षारोपणाची आवश्यकता व वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी संस्थेचे प्रकल्प अधिकारी विनायक डोंगरवार, ग्रामपंचायत सदस्य अमरचंद ठवरे, शिवणकला प्रशिक्षिका अर्चना कऱ्हाडे, ग्रामसंघाच्या आशा शहारे, दुर्गा झोळे, छाया मानकर उपस्थित होते. प्रत्येक महिलेने कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच स्वयंरोजगाराची कास धरावी, दैनंदिन गरजा भागविण्यात महिलांचा हातभार लागणे गरजेचे आहे. आपले गाव स्वच्छ व सुंदर राहण्याबरोबरच गावात वृक्षलागवड करून वृक्षसंवर्धन करावे, असे सरपंच प्रतिमा बोरकर यांनी सांगितले. याप्रसंगी बाजार चौकात जांभूळ, आवळा, करंजी, जांभ प्रजातीच्या वृक्षाची लागवड करण्यात आली. संचालन रिना डोंगरवार यांनी केले, तर आभार अजय खवसकर यांनी मानले. यावेळी उमेदच्या सूर्यकांत हुकरे, इशा रामटेके, स्वाती भैसारे, वनिता राऊत उपस्थित होत्या.