सौंदड : महिला ही अबला नसून सबला आहे. आज प्रत्येकच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्या काळातील इतिहासाकडेही आपण नजर फिरविली, तर नारीशक्तीची प्रचिती येते. संस्काराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्त्वाचे आहे. हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित असून, महिलांनी स्वत:ला कमी समजू नये, असे प्रतिपादन सरपंच गायत्री इरले यांनी केले.
ग्रामपंचायतच्या वतीने सोमवारी (दि.२५) ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित महिला मेळावा व मकर संक्रांतीचे निमित्त साधून आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ग्राम फुटाळाच्या सरपंच सुनिता गोबाडे होत्या. यावेळी बोपाबोडीच्या सरपंच रंजू गोबाडे, निशा तोडासे, आशा राऊत, मालिनी कऱ्हाडे, रंजू भोई, लक्ष्मी इरले, अंजू इरले, मनोरमा फुंडे, रेखा नंदरधने, मीनाक्षी विठ्ठले, अनिता उपरिकर, वर्षा शहारे, कल्पना गायधने, वर्षा मांडारकर, शोभा चोपकर, गुणवंता शहारे प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले. दरम्यान, उपस्थित महिलांना हळदीकुंकू लावून वाण वाटप करण्यात आले. सोबतच महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक मांडून संचालन ग्रामपंचायत सदस्य सुदेक्षणा राऊत यांनी केले. आभार अनिता चुटे यांनी मानले.