परतीचे आदेशच नाहीत : खासगी वाहनांचा वापर करताहेत पदाधिकारीगोंदिया : विधानसभेच्या निवडणुका व त्यांची मतमोजणी संपून निकालही घोषीत करण्यात आले, मात्र २२ आॅक्टोबरपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू असल्याने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून परत घेण्यात आलेली शासकीय वाहने त्यांना परत करण्यात आलेली नाहीत. यामुळे या पदाधिकाऱ्यांना आपल्या खाजगी वाहनांचाच वापर करावा लागल्याचे चित्र दिसून आले.निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेतील नियमांतर्गत पदाधिकाऱ्यांकडे असलेली शासकीय वाहने निवडणूक विभागाकडून मागवून घेतली जातात. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी लागलेल्या आचारसंहितेत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांच्यासह अन्य पदाधिकारी ज्यांच्याकडे शासकीय वाहने आहेत त्यांच्याकडील वाहने जिल्हा निवडणूक विभागाने मागवून घेतली होती. आता मात्र निवडणूक संपली असून निकालही घोषीत करण्यात आले आहेत. मात्र पदाधिकारी शासकीय वाहनांपासून वंचित आहेत.याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता २२ तारखेपर्यंत आचारसंहिता लागू असून त्यानंतरही निवडणूक आयोगाकडून आदेश येईपर्यंत शासकीय वाहने परत करता येणार नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी सांगितले. यामुळे आता या पदाधिकाऱ्यांना आणखी काही दिवस आपल्या शासकीय वाहनाशिवाय जुळवून घ्यावे लागणार असल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)
पदाधिकारी वाहनांविनाच
By admin | Updated: October 20, 2014 23:15 IST