देवरी : आमगाव विभानसभेची धुरा मतदारांनी पुन्हा एकदा भाजपच्या हाती दिली आहे. नवख्या असलेल्या संजय पुराम यांच्यावर मतदारांनी विश्वास टाकला आहे. परंतु बहुजन समाज पक्षातून सुरूवात करून भाजपात आमदार झालेल्या पुराम यांना या क्षेत्राचा विकास करणे खऱ्या अर्थाने जमेल का, असा प्रश्न या भागात विचारला जात आहे.एकेकाळी बहुजन समाज पक्षात असताना ‘समाजाच्या विकासासाठी नैसर्गिकरित्या प्राप्त मेंदूचा वापर केल्याशिवाय सत्याधीश मनुवाद्यांशी लढा देताच येऊ शकत नाही,’ असे आवाहन विद्यमान आमदार संजय पुराम आपल्या भाषणात नेहमीच करीत असत. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गावर चालूनच बहुजनांचा विकास करता येईल, असा त्यांचा विश्वास होता. परंतू आता मनुवाद्यांच्या विचारसरणीने चालणाऱ्या भाजप पक्षाकडून ते आमदार झालेत. आता मनुवाद्यांच्या विचारसरणीने काम करुन आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचा विकास होईल का, असा प्रश्न बहुजन समाजातील अनेकांना पडला आहे.आमगाव-देवरी विधासभेचे आरक्षण अनुसूचित जमाती करता राखीव होताच पुराम यांनी बहुजन समाज पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश मिळविला. सन-२००९ च्या विधासभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर संजय पुराम यांनी भाजपमध्ये तिकिटच्या लालसेने प्रवेश केला. परंतु त्यावेळी त्यांना तिकिट मिळाली नाही. सन २०१० च्या जि.प.च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पत्नी सविता पुराम यांना भाजपने पुराडा जि.प. क्षेत्रातून उमेदवारी दिली. त्यावेळी पुराम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दुर्गा तिराले यांचा पराभव केला. सध्या पुराम या गोंदिया जि.प. मध्ये महिला व बालकल्याण सभापतीचा पदभार सांभाळत आहेत. २००९ मध्ये हुकलेली संधी सन २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत पुराम यांना मिळाली. भाजपने त्यांना तिकिट दिले आणि विरोध असतानाही ते निवडून आले.आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातून सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून एक किर्तीमानसुद्धा त्यांनी प्रस्थापित केला, परंतु आता संजय पुराम यांच्यासमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे. आमगाव-देवरीसारख्या अतिदुर्गम नक्षलप्रभावित क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून अनेक समस्या रेंगाळलेल्या आहेत. यात विधानसभा क्षेत्रातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. या क्षेत्रात शिक्षणाची पुरेशी सोय नाही आणि सर्वसामान्य लोकांच्या आरोग्यविषयी गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे सिंचनाची पुरेशी सोय नसल्याने येथील बळीराजा चिंतित आहे. या क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची सोय नाही. अशा अनेक समस्या या विधानसभाक्षेत्रात आजही भेडसावत आहेत. या सर्व समस्या सोडविण्यात आजपर्यंतच्या आमदारांना यश मिळाले नाही. परंतू आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगिन विकास करण्याची हमी देणारे नवनिर्वाचित आमदार संजय पुराम यांच्याकडे या क्षेत्रातील लोकांच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. आमगाव देवरी क्षेत्रातील सर्वच अडचणी व समस्याची चांगलीच जाणीव पुराम यांना आहे. ते जसे बोलत आजपर्यंत चालत होते तसचे त्यांनी पुढेही करावे अशी सर्वांची अपेक्षा आहे.
आमगाव-देवरी क्षेत्राचा आता तरी विकास होईल का?
By admin | Updated: November 4, 2014 22:43 IST