नसर्गप्रेमींसाठी सुवर्णसंधी
वन्यजीव विभागाची जय्यत तयारी सुरू
नवेगावबांध : वन्यजीव व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून नवेगाव राष्ट्रीय उद्यान व नवेगाव वन्यजीव अभयारण्यातील वन्यप्राण्यांची पाणवठ्यावरील प्रगणना येत्या १४ मे रोजी, अर्थात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आणि रात्रीला चंद्राच्या लख्ख प्रकाशात होणार आहे. सकाळी ८ वाजतापासून सतत २६ तास होणारी ही प्रगणना निसर्गप्रेमींसाठी एक मेजवाणीच ठरणार आहे. सदर प्रगणना १४ मे रोजी सकाळी ८ वाजतापासून सुरु होवून १५ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत चालणार आहे. या कामासाठी नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील पाणवठ्यालगत ४९, तर नवेगाव वन्यजीव अभयारण्यात २१ मचान तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. प्रत्येक मचानीवर एक वनकर्मचारी व एका निसर्गप्रेमीला बसवून वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपल्या जाणार आहेत. ज्या निसर्गप्रेमींना या प्रगणनेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी ओळखपत्र व दोन पासपोर्ट फोटोंसह १२ मे पर्यंत उपविभागीय वनाधिकारी, नवेगाव राष्ट्रीय उद्यान (०७१९६-२२८०५१), किंवा वनपरिक्षेत्राधिकारी स्वागत (०७१९६-२२८२८४), वनपरिक्षेत्राधिकारी, नवेगाव राष्ट्रीय उद्यान (९६०४६४१२१६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वन्यजीव विभागातर्फे करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणार्या वन्यप्रेमींची नावे नोंदणी करुन फोटो ओळखपत्रासह त्यांना संबंधित अधिकारी मान्यता देणार आहेत. वन्यप्राणी प्रगणनेत सहभागी व्यक्तींना सर्व नियमांचे व अटींचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. (वार्ताहर)
महिलाही होऊ शकतील सहभागी
या प्रगणनेत महिला प्रगणकासही सहभागी होता येणार आहे. मात्र त्यांना त्यांच्यासोबत एक जोडीदार ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी सदर जोडीदाराचा अर्ज आपल्या अर्जासोबत पाठवायचा आहे. अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे स्वाक्षरी केलेले दोन फोटो द्यायचे आहेत. प्रगणकांचे प्रशिक्षण हे १४ मे रोजी सकाळी ७.३० वाजता अरण्यवाचन कक्ष, नवेगावबांध येथे आयोजित करण्यात आले आहे. सर्व प्रगणकांना प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. त्यांना निवास, जेवन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वत:च करावी लागणार आहे. मचानावर बसण्यासाठी सोबत एक दरीही स्वत:च आणायची आहे.
प्रगणकावर असणार अनेक बंधने
प्रगणनेदरम्यान मचानावर बसलेले असताना जोराने बोलण्यास, मोबाईल फोन, प्लॅश कॅमेरा, संगीत वाद्य, सर्च लाईट इत्यादी वापरण्यास मनाई राहणार आहे. सोबत शीतपेय, मांसाहारी पदार्थ, भोजन, सिगरेट/बिडी, मद्य व इतर आक्षेपार्ह वस्तू घेवून जाण्यासही मनाई राहणार आहे. मचानावर असताना निसर्गाशी एकरुप अशा रंगाचेच कपडे परिधान करावे लागणार आहेत. प्रगणकाला दिलेल्या मचानात बदल करण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे एकदा मचानावर बसल्यावर प्रगणना संपेपर्यंत परत जाता येणार नाही. ठरवून दिलेल्या मार्गानेच प्रगनकाला प्रगणनास्थळी उपस्थित राहावे लागणार आहे.