हरिदास ढोक - देवळी आरोग्य विभागाच्या नियोजन शून्यतेमुळे येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या सुविधा कुचकामी ठरत आहे. गावात सुसज्ज इमारत व सुविधा असताना केवळ कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्या लोकोपयोगी ठरत नाही. वास्तूच्या उद्घाटनापासून तर आजच्या घटकेपर्यंत दोन महिन्याचा काळ झाला तरी येथे कर्मचाऱ्यांचा पत्ता नाही. केवळ दोन परिचारिकेच्या भरवशावर रुग्णालयाचे काम सुरू आहे. यामुळे ही इमारत येथील नागरिकांकरिता केवळ शोभेची ठरत आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून वर्धा मार्गावर साडेचार एकराचे परिसरात तीन कोटींच्या खर्चातून ग्रामीण रुग्णालाची सुसज्ज इमारत तर दीड कोटीच्या खर्चातून वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वसाहतीचे बांधकाम करण्यात आले. या वास्तूचे बांधकाम गत दीड वर्षापूर्वीच पूर्णत्वास येऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते; परंतु आमदार रणजीत कांबळे यांनी केलेला विकास लोकांच्या गळी ताजा-ताजा उतरविण्यासाठी या रुग्णालयाचे उद्घाटन विधानसभांच्या निवडणुकीपर्यंत ओढण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण म्हटल्यानंतर या ठिकाणी आरोग्य विभागाच्या निकषाप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या भरती सोबतच रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, एक्सरे मशीन, शवविच्छेदनाची व्यवस्था व इतर आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याची आरोग्य विभागाची बांधीलकी आहे; परंतु आजच्या तारखेपर्यंत यापैकी कोणतीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे हे रुग्णालय नावापुरते राहिले आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या भरतीची तरतुद बजेटमध्ये न केल्यामुळे या रुग्णालयातील १४ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका मार्च महिन्यापर्यंत खोळबंल्या आहे. रुग्णालयाला २५ ते ३० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतांना पहिल्या टप्प्यात फक्त १४ कर्मचाऱ्यांची तरतुद करणे, हे सुध्दा न सुटणारे कोडे आहे. या १४ कर्मचाऱ्यांमध्ये एक वैद्यकीय अधीक्षक, तीन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, सात अधिपरिचारीका, एक परिचारक व दोन चपराशांचा समावेश आहे. पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गोपाल नारलवार यांना याठिकाणी कागदोपत्री प्रतिनियुक्तीवर देण्यात आले; परंतु पुलगाव शहराचा कार्यभार सांभाळून त्यांना याठिकाणी वेळ देणे शक्य होत नसल्यामुळे त्यांचे प्रतिनियुक्ती नावापुरतीच ठरत आहे. ३० खाटांची व्यवस्था असलेल्या या रुग्णालयात रुग्णांची भरती गत दोन महिन्यात निरंक आहे. बाह्यरुग्ण नोंदणी सुध्दा नगन्यच आहे. शवविच्छेदनासाठी वास्तू आहे; परंतु कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे ती कुचकामी ठरत आहे. खाटा, गाद्या, प्रसूती विभाग आदींची व्यवस्था असून कर्मचाऱ्यांच्या अभावी त्या निरुपयोगी ठरत आहेत. एक्सरेची मशीन नसल्यामुळे या रुग्णालयाचा खेळखंडोबा झाला आहे. अॅम्बुलन्स नसल्यामुळे हे रुग्णालय विकासाचा पांढरा हत्ती ठरले आहे.
ग्रामीण रुग्णालय ठरतेय पांढरा हत्ती
By admin | Updated: October 27, 2014 22:40 IST