गोंदिया : आपलेही शहर स्वच्छ आणि सुंदर असावे ही कल्पना गोंदियावासीयांसाठी कायम दिवास्वप्नच ठरली आहे. ऐन दिवाळीच्या काळात सर्वांची घरे, दुकाने स्वच्छ आणि सुभोभित केलेली असताना गोंदियाचे रस्ते आणि प्रत्येक चौक मात्र टाकाऊ कचऱ्यांनी अक्षरश: विद्रुप झाला आहे. गुरूवारी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी (दि.२३) एक दिवस नगर परिषदेला सुटी असताना शहराची ही अवस्था झाली आहे तर पुढील तीन दिवसाच्या सुट्यांमध्ये शहर किती विद्रुप होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.दिवाळीची तयारी करताना सर्वात आधी घरा-दाराची साफसफाई होते. जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी नांदते, असे म्हटले जाते. पण गोंदिया शहर मात्र त्यासाठी अपवाद ठरले आहे. ऐन दिवाळीत शहर स्वच्छ आणि सुंदर दिसण्याऐवजी चक्क रस्त्या-रस्त्यांवर साचलेल्या कचऱ्याने माखून गेले आहे. दररोज कोट्यवधी रुपयांची व्यापारी उलाढाल होणाऱ्या या शहराची ही दुरवस्था शहराच्या विद्रुपतेत भर घालत आहे.अगदी बाराही महिने अस्वच्छता आणि तुंबलेल्या नाल्यांसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या गोंदियात अधूनमधून नगर परिषद स्वच्छता मोहीम राबवून बऱ्यापैकी साफसफाई करते. मात्र तीन-चार दिवसातच परिस्थिती ‘जैसे थे’ होते. वास्तविक कार्यालयाला सुट्या असल्या तरी स्वच्छता विभागाला मात्र सुटीवर जाता येत नाही. शहराची स्वच्छता दररोज करणे गरजेचे असते. पण नगर परिषद प्रशासनाने गोंदियावासीयांना अक्षरश: कचऱ्यात ढकलून स्वच्छतेकडे पाठ फिरविल्याचे चित्र गोंदियातील रस्त्यांवर फेरफटका मारला असता दिसून येते. गेल्या पाच-सहा दिवसांपासून नेहरू चौकापासून दुर्गा मंदिर चौकापर्यंत आणि गांधी चौकापासून तर श्री टॉकीज चौकापर्यंतच्या रस्त्यांवरील दुकानांमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीने उच्चांक गाठला होता. नागरिकांच्या गर्दीत रस्ते दिसतच नसल्यामुळे रस्त्यावर किती कचरा साचलेला आहे याची कल्पनाच येत नव्हती. मात्र शुक्रवारी (दि.२४) खरेदीचा जोर कमी झाल्यानंतर संपूर्ण रस्त्यावरील चित्र उघड झाले.विविध वस्तूंच्या दुकानातून वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूची पॅकिंग असणारे पुठ्ठे, प्लॅस्टिकचे कव्हर, कागदी कव्हर, छोट्या कॅरीबॅग असा कितीतरी प्रकारचा कचरा रस्त्यावर साचलेला दिसत होता. विशेष म्हणजे रस्त्यावर नागरिकांनी टाकलेला हा कचरा कमी होता म्हणून की काय प्रत्येक दुकानदाराने दुकानातून निघालेल्या कचऱ्याचा ढिगारा दुकानासमोरच लावून ठेवलेला दिसत होता. त्यामुळे रस्त्यावर विखुरेला कचरा आणि रस्त्याच्या कडेला साचलेले कचऱ्यांचे ढिगारे पाहून शहर कचऱ्यात हरविल्याचा भास शुक्रवारी होत होता. लक्ष्मीपूजनानिमित्त चौकाचौकात विक्रीसाठी केळीचे खांब विक्रीसाठी आले होेते. शिल्लक राहिलेल्या पानांचा आणि खांबांचा कचराही अनेक ठिकाणी तसाच पडून होता. (जिल्हा प्रतिनिधी)
कुठे गेले स्वच्छता अभियान?
By admin | Updated: October 25, 2014 01:31 IST