७० गावे-वाड्यांसाठी ५० उपाययोजना
गोंदिया : उन्हाळ््यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची स्थिती गंभीर रूप धारण करते. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाने १०४ गावे/वाड्यांसाठी १११ उपाययोजनांचा पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला होता. त्या आराखड्याचे सध्या सर्व्हेक्षण केले जात असून यातील ७० गावे/वाड्यांसाठी ५० उपाययोजनांचीच शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या कृती आराखड्यात गोंदिया तालुक्यातील २१ गावे/वाड्यांसाठी, गोरेगाव तालुक्यात १२ गावे/वाड्यांसाठी, सडक अर्जुनी तालुक्यात सात गावे/वाड्यांसाठी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात १८ गावे/वाड्या, तिरोडा तालुक्यात १० गावे/वाड्या, सालेकसा तालुक्यात पाच वाड्या, देवरी तालुक्यात २० गावे/वाड्या तर आमगाव तालुक्यातील ११ गावे/वाड्यांसाठी हा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यानुसार नवीन विंधन विहीर, नळ योजनवा विशेष दुरूस्ती, विहीर खोलीकरण व इनवेल बोअर, खाजगी विहीर अधिग्रहण यासारख्या १११ उपाययोजना करावयाच्या होत्या.
त्यानुसार विभागाच्या भूवैज्ञानिकांनी एप्रिल महिन्यात आराखड्यात नमूद असलेल्या गावे/वाड्यांचे सर्वेक्षण सुरू केले. विशेष म्हणजे यामध्ये भुवैज्ञानिकांनी नविन विंधन विहिरींना प्राधान्य देत त्यांचे सर्वेक्षण केले. यामध्ये या भूवैज्ञानिकांनी ७० गावे/वाड्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या करीता ५० उपाययोजनांना हिरवी झेंडी दिली असून त्यांची शिफारस केली जाणार आहे. यामध्ये ५४ गावे व १० वाड्यांसाठी ४४ विंधन विहिरींना भूवैज्ञानिकांनी आपल्या स्तरावर मंजूर केले आहे. तर आमगाव तालुक्यातील फुक्कीमेटा येथे नळ योजना दुरूस्ती, सालेकसा तालुक्यातील रामाटोला येथे एक खाजगी विहीर अधिग्रहण करण्यास भुवैज्ञानिकांची नाहरकत आहे. शिवाय गोरेगाव तालुक्यातील दोन व देवरी तालुक्यातील दोन गावांत विहीर खोलीकरण करण्यास भुवैज्ञानिक राजी असून अशाप्रकारे ७० गावे/वाड्यांसाठी ५० उपाय योजनांची शिफारस त्यांच्याकडून केली जाणार आहे. म्हणजेच अद्याप ३४ गावे/वाड्यांसाठी ६१ उपाययोजनांचे सर्वेक्षण व्हायचे आहे. (शहर प्रतिनिधी)