दोन वर्ष लोटले : समाजकल्याण विभागाचे दुर्लक्ष केशोरी : शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून वर्ग ५ ते १० वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, नवबौद्ध, विमुक्त भटक्या जातीमधील विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत होती. मागील दोन वर्षांपासून आॅनलाईन प्रणालीद्वारे आवेदन पत्र भरण्यात आले आहेत. परंतु अजूनही विद्यार्थिनींना संबंधित विभागाने त्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती केव्हा मिळणार? असा सवाल समाज कल्याण विभागाला केला आहे. शासनाने कोणतीही विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरिता सक्तीचे शिक्षण कायदा अंमलात आणला आहे. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनींना गणवेश, वह्या, पुस्तके वितरण करुन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध भटक्या विमुक्त जातीमधील वर्ग ५ ते १० वीपर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना यासारख्या सुविधा उपलब्ध करुन कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची शासनाने दखल घेतली आहे. समाजकल्याण विभागाने आॅनलाईन प्रणालीद्वारे आवेदन पत्रे स्वीकारणे सुरू केले, तेव्हापासून विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मिळाली नसल्याची पालकांची ओरड आहे. या योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याने समाज कल्याण विभागावर नागरिकांनी असंतोष व्यक्त केला आहे. (वार्ताहर)
सावित्रीबाई शिष्यवृत्तीची विद्यार्थिनींना प्रतीक्षा
By admin | Updated: July 23, 2016 02:17 IST