गोंदिया : स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वात पवित्र गंगा नदीच्या स्वच्छतेचा विडा भारत सरकारने उचलला आहे. त्याचप्रमाणे या अभियानांतर्गत गोंदिया नगर परिषद व गोंदिया रेल्वे प्रशासनाने शहरांतील सरकारी तलावातील घाण हटविण्याचा प्रयत्न करण्याची मागणी परिसरात जोर धरू लागली आहे. तलावातील जमा झालेल्या घाण पाण्याने नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे.नागरिकांचे आरोग्य चांगले राहिले तरच विकास घडून शक्तिशाली राष्ट्र बनू शकतो. यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या औचित्यावर २ आॅक्टोबरपासून देशभरात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानांतर्गत प्रत्येक लोकप्रतिनिधींनी एकेक गाव दत्तक घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील हातात झाडू घेवून गावांची स्वच्छता केली. तसेच कोट्यवधी रूपये खर्च करुन आता गंगा नदीच्या स्वच्छतेचा विडा भारत सरकारने उचलला आहे. त्याचप्रमाणे गोंदिया नगर परिषद व गोंदिया रेल्वे प्रशासनाने शहरातील सरकारी तलावांची सफाई करण्याचा विडा उचलावा, अशी मागणी सर्व स्वतरावरून करण्यात येत आहे.गोंदिया शहरातील सर्वात जुना सरकारी तलाव रेल्वे रुळाला लागून आहे. या तलावात प्रत्येक ऋतूत पाणी जमा असतो. या तलावातील घाण पाण्याच्या दुर्गंधीने येथून वहिवाट करणाऱ्या नागरिकांना तोंडावर रुमाल बांधून जाण्याव्यतिरिक्त पर्याय उरत नाही. त्याच तलावाच्या किनाऱ्यांवर घरे बांधण्यात आली आहेत. या घाण व दुर्गंधयुक्त पाण्याने परिसरातील आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. काहीवेळा या तलावातून अज्ञात मृतदेहदेखील काढण्यात आले आहेत.या तलावाचे सोंदर्यीकरण केले तर गोंदिया न.प. व गोंदिया रेल्वे प्रशासनाला प्रतिवर्र्ष लाखो रुपयांचा कर प्राप्त होऊ शकतो. एवढेच नव्हे तर गोंदिया नगर परिषदेंतर्गत सिव्हिल लाईनमधील मामा चौकात असलेला जुना सरकारी तलाव हा कचऱ्याने तुडूंब भरलेला आहे. या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याच्या सौंदर्यीकरणासाठी प्रशासन मागील दोन वर्षांपासून कामाला लागला आहे. मात्र, अद्यापपर्यंत सौंदर्यीकरणाचे काम ठप्प पडले आहे. या तलावातील पाणी दुर्गंधीने व्यापलेले आहे. हे तलाव शहराच्या मधोमध असल्याने शहराच्या सौंदर्यात अडथळा निर्माण करीत आहे. या तलावालादेखील स्वच्छ भारत अभियानाची गरज आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत सरकारी तलावांची सफाई केली तर निश्चितरुपाने या तलावांच्या व शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल, एवढे मात्र निश्चित. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील तलावांना स्वच्छता अभियानाची प्रतीक्षा
By admin | Updated: December 31, 2014 23:27 IST