यशवंत मानकर - आमगावआमगाव तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे योग्य नियोजनाअभावी कुचकामी ठरत आहे. नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकाच्या आरोग्याला धोका आहे. मात्र प्रशासन याकडे पाठ दाखवित आहे.आमगाव तालुक्यात ६४ ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा यासाठी शासन स्तरावर प्रभावी उपाययोजना अंमलात आणत आहेत. परंतु योग्य नियोजनाअभावी योजनांचा योग्य लाभ नागरिकांना मिळत नाही. तालुक्यात १ लाख २० हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्रीय योजना नसल्याने नागरिकांना कासवगतीने चालणारी खंडित पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून राहावे लागत आहे.तालुक्यातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी गाव पातळीवर जलकुंभ उभारण्यात आले. परंतु या जलकुंभांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात आले नाही.नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी शासनाने ४८ गावांची बनगाव प्रादेश्कि पाणी पुरवठा योजना नागरिकांच्या पदरी घालण्यात आली. परंतु योजना यशस्वी करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व पदाधिकारी यांनी योग्य दखल घेतली नाही. त्यामुळे ही योजना खंडीतपणे सुरू राहीली. यात नागरिकांना या योजनेने शुद्ध पाण्यासाठी घाम गाळण्यास भाग पाडले. योजनेवरील खर्च व मिळणारा निधी अपूर्ण असल्याने ही योजना अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे या योजनेत समाविष्ठ ४८ गावांपैकी फक्त २६ गावे पाण्याचा उपभोग घेत आहे. परंतु निरंतर व जलशुद्ध देण्यासाठी ही योजना यशस्वी न ठरल्याने २२ गावांनी यातून माघार घेतली. या योजनेचे पाणी पुरवठा खंडित होते. दुरुस्ती अभावी अशुद्ध पाणी पुरवठा हे या योजनेचे मुख्य कारण आहे.आमगावसह ३७ गावांतील पाणी पूर्ततेसाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने नियंत्रण स्वत:कडे ठवले आहे. परंतु या गावांमध्ये शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासन स्तरावर आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालता आली नाही. तालुक्यात जुनीच जल वाहिनींच्या माध्यमाने आजही पाणी पुरवठा करण्यात येत आहे. दुरुस्ती अभावी व निरंतर खोदकामांमुळे अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे नागरिकांना मिळणारा पाणी घाणीच्या स्वरुपात मिळतो. गाव पातळीवर असलेली जलकुंभात नदी, नाले पात्रातील जलपुरवठ्यावरुन सरळ जलकुंभात पाण्याचे साठवण करण्यात येते. तेच पाणी शुद्धीकरण न करता सरळ नागरिकांना पुरवठा केला जातो. नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी दुसऱ्या स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने ग्रामपंचायतच्या सहकार्याने नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी कोणतीच केंद्रीय योजना हाती घेतली नाही. प्राधिकरणाच्या योजना स्वत:कडे घेऊन त्या योजनांची विल्हेवाट लावण्याचे कार्य पुढे केले. त्यामुळे या योजनाही अखेरची घरघर अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दररोज शुद्ध पाणी मिळण्याऐवजी खंडित व अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यास सदर विभाग हतबल ठरला आहे.प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील २६ गावे तर आमगावसह ३७ स्वतंत्र पाणी पुरवठा योजना गावपातळीवर शुद्ध पाणी पुर्ततेसाठी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. पावसाळ्यात पूर्तता होणाऱ्या अशुद्ध पाण्यामुळे आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. याकडे प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी आहे.
६४ गावांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा
By admin | Updated: July 21, 2014 00:15 IST