रात्रीतून बदलविला पक्ष : एकाही उमेदवाराला विजयश्री नाहीगोंदिया : जिल्ह्यात यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चारही विधानसभा मतदार संघात मोठी चुरस पहायला मिळाली. अनेक वर्षापासूनची युती आणि आघाडी एकाचवेळी तुटल्यानंतर सर्वांनी आपापल्या पक्षाची ताकद आजमावून पाहिली. परंतू अनपेक्षितपणे झालेल्या घडामोडींमुळे बेसावध असलेल्या पक्षांना ऐनवेळी योग्य उमेदवार मिळणे कठीण झाल्याने दुसऱ्या पक्षातील असंतुष्टांना आयात करावे लागले. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या घेणाऱ्या अशा आयारामांना मतदारांनी मात्र स्पष्टपणे नाकारले आहे.यावेळी चारही मतदार संघांमध्ये पक्षाचे तिकीट मिळण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची सर्वाधिक गर्दी भारतीय जनता पक्षात होती. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश पाहता यावेळी विजयाची संधी आहे हे हेरून भाजपात इच्छुकांची गर्दी प्रत्येक मतदार संघातच होती. मात्र गोंदियात खुलेआमपणे पुढे येऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची हिंमत कोणत्याही पदाधिकाऱ्याने केली नाही. शिवाय इतर पक्षात जाऊन तिकीट मिळण्याची संधीही नव्हती. मात्र तिरोडा, आमगाव आणि अर्जुनी मोरगाव या मतदार संघांमध्ये मात्र भाजपमधील असंतुष्टांनी अगदी रात्रीतून शिवसेनेचा तंबू गाठत त्या पक्षाचे तिकीट मिळविले. त्यात तिरोडा मतदार संघातून आतापर्यंत भाजपशी एकनिष्ठ असलेले, माजी जि.प.उपाध्यक्ष राहिलेले पंचम बिसेन, अर्जुनी मोरगाव मतदार संघात पाच वर्षापूर्वी भाजपवासी झालेल्या जि.प.सदस्य किरण मेश्राम, तर देवरी मतदार संघात भाजपच्या आदिवासी आघाडीचे महामंत्री असलेले मुलचंद गावराने यांनी शिवसेनेच्या तिकीटवर नशिब आजमावण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर भाजपचे गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असलेले रमेश ताराम यांनी आपले तिकीट कटताच राष्ट्रवादी काँग्रेसचा तंबू गाठत तिकीट पदरी पाडून घेतले. परंतू या एकाही आयारामांना मतदारांनी साथ दिली नाही.रात्रीतून पक्षबदल करून दुसऱ्या पक्षाच्या नावावर निवडणूक लढणाऱ्या या चारही उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते घेतली ती देवरी मतदार संघात राष्ट्रवादीच्या तिकीटवर लढलेले रमेश ताराम यांनी. त्यांना ३५ हजार ९११ मते मिळाली. तरीही त्यांना तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावे लागले. मात्र शिवसेनेच्या तिकीटवर लढणाऱ्या इतर उमेदवारांना अपेक्षित मतेही मिळाली नाहीत. किरण कांबळे यांना १५ हजार ३३६ मतांसह चौथे स्थान, पंचम बिसेन यांना ११ हजार ९७८ मतांसह पाचवे स्थान, तर मुलचंद गावराने यांना ९ हजार १७४ मतांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. (जिल्हा प्रतिनिधी)
कोलांटउड्या घेणाऱ्यांना मतदारांनी नाकारले
By admin | Updated: October 20, 2014 23:14 IST