गोंदिया : नवेगावबांध येथील बसस्थानकावर निवडणूक प्रचारासाठी श्वेतपत्र लावणाऱ्या आॅल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत नवेगावबांधच्या प्रवेशव्दारावर आॅल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्षाच्या प्रचार संबंधातील श्वेतपत्रिका कोणतीही परवानगी न घेता लावली. ही बाब नवेगावबांध येथील देवराम गोमाजी नेवारे (४७) यांच्या शुक्रवारी सायंकाळी लक्षात आली. या प्रकारासंदर्भात जिल्हाध्यक्ष प्रमोद एच. गजभिये, ज्ञानेश्वर रहांगडाले दोन्ही रा. गोंदिया, मनोज बंसोड लाखांदूर, शिवाजी ब्राम्हणकर सिलेझरी, अशोक तिलाम म्हसवाणी, प्रमोद तिरेले मोहाडी, रामकृष्ण घासले पाटेकुर्रा व अन्य दोन अशा नऊ जणांवर नवेगावबांध पोलिसांनी मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याच बसस्थानकावर आरोपी पराग ऊर्फ बाळा व्यंकटराव बोरकर याने विधानसभा निवडणूक २०१४ च्या संबंधाने यशवंत भैसारे यांच्या रांगोळी विक्रीचे लाकडी ठेल्याच्या दर्शनीय भागावर फोटो असलेले एक ते नऊ वचननामा लिहिलेली पत्रिका लावली होती. विनोद कटरे यांच्या तक्रारीवरून नवेगावबांध पोलिसांनी महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकर प्रतिबंधक अधिनियम १९९५ चे कलम ३ नुसार पराग बोरकर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवेगावबांध येथे दाखल झालेला हा आचारसंहिता भंगचा पहिलाच गुन्हा ठरला आहे. यामुळे अनेकांना धास्ती बसली आहे. (तालुका प्रतिनिधी)
नवेगावबांध येथे आचारसंहितेचे उल्लंघन
By admin | Updated: September 20, 2014 23:53 IST