खैरलांजीतील दुर्घटना : प्राथमिक अहवालावरून तिघांचे निलंबनपरसवाडा : तिरोडा पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेत फुलझाडांभोवती उभी केलेली शोभेची भिंत कोसळल्याने पहिलीतील विद्यार्थी मयंक भगत याचा मृत्यू झाला तर त्याची बहीण पल्लवी (वर्ग ४ था) जखमी झाली. या अपघातासाठी प्रभारी मुख्याध्यापक व दोन शिक्षकांचा दुर्लक्षितपणाच कारणीभूत असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले. त्यामुळे तिघांना तूर्त निलंबनाला सामोरे जावे लागले.दरम्यान सदर दुर्घटनेनंतर शाळेला भेट देण्यासाठी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली. खा.नाना पटोले यांनी रात्रीच शाळेला भेट दिली तर जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे व शिक्षण तथा आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांनी शाळेच्या परिसराची पाहणी केली. यात शाळेत बरीच अनियमितता आढळली. गावातील नागरिकांनी शाळेची सर्व माहिती दिली. त्यामुळे अध्यक्ष व सभापती यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दूरध्वनीवरून मुख्य कार्यपालन अधिकारी पुलकुंडवार यांना दिले. त्यानुसार प्र.मुख्याध्यापक मंगेश पडोळे, तसेच सहायक शिक्षक नत्थू पारधी व विरेंद्र चव्हाण यांना निलंबित करण्यात आले.पदाधिकाऱ्यांनी मृतक विद्यार्थीच्या घरी जाऊन वडील कृष्णा व आई, बहीण पल्लवीची विचारपूस केली. पल्लवीने सर्व आपबिती कथन केली. घटनास्थळाची माहिती अध्यक्ष मेंढे, सभापती कटरे इतर उपस्थितांना दिली. शाळेत पेपर सुरू असताना शिक्षक कार्यालयातच बसून होते. मुख्याध्यापक परसवाडा केंद्रात मिटींगसाठी गेले होते. चार शिक्षक गप्पा मारीत होते. त्यामुळे त्यांचे दुर्लक्ष या घटनेसाठी कारणीभूत ठरविण्यात आले. यावेळी माजी जि.प.सदस्य डॉ.योगेंद्र भगत, रमेश पटले, राधेलाल पटले, मनोहर बुधे, पोलीस पाटील राजू कडव यांनी घरी जाऊन आई-वडीलाचे सांत्वन केले.
शिक्षकांच्या दुर्लक्षपणामुळे विद्यार्थ्याचा बळी
By admin | Updated: October 21, 2016 01:47 IST