अर्जुनी/मोरगाव : इटखेडा येथील सरपंच जनार्धन मेश्राम यांचेवर सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला. याविरूध्द त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया यांचेकडे विवाद अर्ज दाखल केला. हा अर्ज फेटाळण्यात आला असून इटखेडा येथील सरपंचाविरूध्द पारित अविश्वास ठराव व घोषीत निर्णय वैध ठरविण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार इटखेडा/इसापूर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक २१ आॅक्टो. २०१२ रोजी झाली. या ग्रामपंचायतमध्ये ९ सदस्य आहेत.
सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदावर जनार्धन मेश्राम हे निवडून आले. ते गावाबाहेर असतांना २४ फेब्रु. रोजी त्यांचे गैरहजेरीत इतर ८ सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला होता. तत्पूर्वी १७ फेब्रु.रोजी सरपंच विरूध्द अविश्वास प्रस्तावाची नोटीस इतर सदस्यांनी तहसीलदारांना दिली होती. तहसीलदार संतोष महाले यांनी १८ फेब्रु. रोजी अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलावली. सरपंच मेश्राम यांचे घराला कुलूप लावले असल्याने त्यांचे घरात दर्शनी भागात नोटीस चिपकवून तीन साक्षीदारांच्या सह्या घेण्यात आल्याने अप्पर जिल्हाधिकार एन.के. लोणकर यांनी ही कार्यवाही नियमानुसार योग्य असल्याचे ठरविले.
अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर सरपंच मेश्राम यांनी १ ते ५ मुद्यावर अप्पर जिल्हाधिकार्यांकडे याचिका दाखल केली होती. अप्पर जिल्हाधिकार्यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३५ (३-ब) अंतर्गत सरपंच मेश्राम यांनी दाखल केलेला विवाद अर्ज फेटाळून लावला. अर्जदार सरपंच मेश्राम यांनी तहसीलदार, उपसरपंच वासुदेव उईके व इतर ७ सदस्य तसेच ग्रामसचिव यांचेविरूध्द अर्ज दाखल केला.