३४ लाखांचा गंडा : सहा आरोपी नागपुरातील गोंदिया : वासनकर इन्व्हेस्टमेंट कंपनीने रक्कम दुप्पट करण्याच्या नावावर गुंतवणूकदारांकडून घेतलेली रक्कम परतच केली नाही. गोंदियात आतापर्यंत आठ लोकांना ३४ लाखांनी गंडा घातल्याचे उघड झाले आहे. यात गोंदियातील २ आरोपींसह नागपुरातील ६ आरोपींचा समावेश आहे.२८/९/२००८ ला घेतलेली रक्कम दुपटीने परत न देणाऱ्या वासनकर इन्वेस्टमेंट कंपनीने मुकेश पटेल व पल्लवी पटेल यांच्याकडून १२ लाख ६२ हजार ५०० रुपये, किशोर रामचंद नागपूरे यांच्याकडून ३ लाख ३६ हजार रुपये, घनश्याम कुंभलकर व प्रिय कुंभलकर यांच्याकडून १६० हजार रुपये, रचित पटेल व किरणबेन पटेल यांच्याकडून १ लाख २५ हजार रुपये, शशीनिवास मिश्रा यांच्याकडून ४ लाख ५० हजार रुपये, ज्योती तन्ना यांच्याकडून २५ हजार रुपये, किरीट शाह यांच्याकडून १० लाख रुपये तर शैलेश दुबे यांच्याकडून ५० हजार रुपये असे एकूण ३४ लाख ८ हजार ५०० रुपये घेतले होते. ती रक्कम ७७ लाख ८३ हजार ४८० रुपये होऊन परत मिळणार होती. परंतु रक्कम परत देण्यात आली नाही. वासनकर इन्वेस्टमेंट कंपनीत मुरलीधर माहुरे हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते तर प्रशांत वासनकर, विनय वासनकर, भाग्यश्री प्रशांत वासनकर, मिथीला विनय वासनकर, अभिजित चौधरी, चंद्रकांत राय हे या कंपनीचे पदाधिकारी व संचालक म्हणून कार्यरत आहेत. माहोरे यांच्या घरीच या कंपनीसंबंधी चार सभा घेण्यात आल्या. माहुरे स्वत: या संबंधात निर्णय घेत होते. गोंदियाच्या स्वागत लॉन येथे मोठा सेमिनार घेण्यात आला होता. माहुरे व त्यांच्या इन्वेस्टमेंट कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी २५ ते ३० कोटीचा अपहार केल्याची तक्रार करण्यात आली. विदर्भात अनेक जिल्ह्यात ही कंपनी सुरु होती. या प्रकरणातील सर्व आरोपींवर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुरलीधर एम. माहुरे (६५) व निखिल मुरलीधर माहुरे (३५) रा.डब्लिंग ग्राऊंडजवळ, सिव्हिल लाईन गोंदिया यांच्यावरही गुन्हा दाखल केल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
वासनकर इन्व्हेस्टमेंटने आठ लोकांना लुटले
By admin | Updated: August 13, 2015 02:15 IST