पक्षीगणनेचा पहिला टप्पा उत्साहातगोंदिया : वन विभागाच्या प्रधान मुख्य संरक्षकांच्या आदेशानुसार जिल्ह्यात पक्षीगणनेचा हा पहिला टप्पा रविवारी (दि.२१) उत्साहात पार पडला. या पक्षीगणनेत सामील झालेल्या पक्षीतज्ज्ञ व निरीक्षकांनी विविध प्रजातीच्या असंख्य पक्ष्यांची नोंद करीत त्यांना कॅमेराबद्ध केले. विशेष म्हणजे काही पक्षी निरीक्षकांनी यंदा पक्ष्यांची संख्या वाढल्याचे मत ही लोकमतकडे व्यक्त केले. वन्य पशुंसह आता पक्ष्यांप्रतीही वन विभाग गंभीर झाल्याचे दिसून येत असून यामुळेच प्रधान मुख्य वन संरक्षकांनी दरवर्षी पक्ष गणना करण्याचे आदेश काढले. त्यांच्या आदेशानुसार आता दरवर्षी २१ डिसेंबर व ११ जानेवारी रोजी पक्षी गणना करणे वनविभागाला बंधनकारक झाले आहे. त्यानुसार रविवारी (दि.२१) पक्षीगणनेचा पहिला टप्पा जिल्ह्यातील परसवाडा, झिलमीली, बाजारटोला, लोहारा, पठाणटोला, माकडी (गोंदिया तालुका), कुंभारटोली (आमगाव), झालीया (सालेकसा), सलंगटोला, जांभळी (गोरेगाव), मालीजुंगा (सडक अर्जुनी), नवेगावबांध, श्रृंगारबांध, सिरेगावबांध, इटियाडोह, कोहळीटोला (अर्जुनी मोरगाव) व चोरखमारा (तिरोडा) या तलावांवर घेण्यात आला. येथील पक्षी प्रेमी व काही सामाजीक संस्थांच्या सहकार्यातून पार पडलेल्या या पक्षीगणनेत सहभागी झालेल्या पक्षी निरीक्षकांनी सकाळी ६ ते ११ वाजता दरम्यान पक्षी निरीक्षण केले. या निरीक्षणात त्यांनी विविध प्रजातींचे असंख्य पक्षी टिपल्याचेही लोकमतला सांगितले. विशेष म्हणजे या पक्षी निरीक्षणात भाग घेणाऱ्या पक्षीमित्र रूपेश निंबार्ते यांनी नवेगावबांध येथील तलावावर केलेल्या निरीक्षणात पक्ष्यांची संख्या वाढल्याचे सांगीतले. तर सावन बहेकार यांनी लोहारा व परसवाडा येथे केलेल्या निरीक्षणात संख्या हजारांच्या घरात असल्याचे सांगीतले. तर यावर्षी मोठ्या संख्येत पक्ष्यांचे आगमन झाल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.या निरक्षणात भरत जसानी, शैलेश ठाकूर, अशोक पडोळे, आशिष वर्मा, रितेश अग्रवाल, जलाराम बुधेवार, अंकीत ठाकूर, महेंद्र राऊत, राजू खोडेचा, मुकूंद धुर्वे, दुष्यंत रेभे, अंकूर काळी, त्र्यंबक जरोदे, संजय आकरे यांच्यासह नवेगावबांधचे लाडे, शहारे, वानखेडे यांच्यासह अन्य पक्षीप्रेमींनी भाग घेतला होता. तर त्यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारीही सोबत होते. यात नवेगावबांध परिसरात घेण्यात आलेल्या पक्षी गणनेत नवेगावबांधचे उप वन संरक्षक विलास काळे, माडवी, गोठणगावचे गंगावने, नागपूरचे सहायक वन संरक्षक पंचभाई, नवेगावबांधचे गुप्ता यांच्यासह कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे पक्षी निरीक्षणांतर्गत निरीक्षकांनी मोठ्या संख्येत पक्षी टिपले असून याचा अहवाल प्रधान वन संरक्षकांकडे पाठविला जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)
विविध प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद
By admin | Updated: December 21, 2014 23:00 IST