विवेक लखोटे : वित्तेीय साक्षरता जागरुकता कार्यक्रमगोंदिया : बचतगटाच्या माध्यमातून महिला संघटीत झाल्या आहेत. पैशांची बचत करुन महिला आता व्यवसायाकडे वळत आहे. नफा आणि तोटा याचा हिशोब प्रत्येकाला समजत असला तरी पैशांचा विनियोग योग्य प्रकारे करावा, अशी सूचना अग्रणी जिल्हा प्रबंधक विवेक लखोटे यांनी केली.तालुक्यातील ढाकणी ग्रामपंचायत येथे बुधवारी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकच्यावतीने (नाबार्ड) आयोजित वित्तीय साक्षरता जागरुकता कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच प्रिती मेश्राम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेचे जिल्हा समन्वयक चिंधालोरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे जिल्हा व्यवस्थापक द्विवेदी यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना त्यांनी, केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना असून योजना राबविण्यामागचा उद्देश ग्रामीण जनतेचे कल्याण व्हावे हा आहे. शासनाच्या विविध योजनांचे अनुदान लाभार्थ्यांना मिळाले पाहिजे याकरीता प्रत्येक व्यक्तीचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. केलेली बचत भविष्यात उपयोगाची असते. प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, जीवन सुरक्षा योजना आणि अटल पेंशन योजना आदी विमा योजनांचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले. तसेच या योजनांचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना गावपातळीवरच मिळावा यासाठी बँकांचे गावपातळीवरील प्रतिनिधी लाभार्थ्यांचे अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह परिपुर्ण भरुन बँकेकडे जमा करतील. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाने वित्तिय साक्षर असले पाहिजे. वित्तिय साक्षरतेमुळे विविध कामांसाठी अर्ज मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.सरपंच मेश्राम यांनी, गावातील प्रत्येक व्यक्तीने विमा काढावा. कोणतीही दुर्घटना केव्हा होईल हे सांगता येत नसल्यामुळे विमा संरक्षण कवच आवश्यक आहे. बचतगटातील महिलांनी घेतलेल्या कर्जातून चांगला व्यवसाय उभारावा असे मत व्यक्त केले. चिंधालोरे यांनी, तीनही विमा योजनांचा लाभार्थ्यांनी ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत विमा काढावा. या विमा योजना गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. आर्थिक साक्षर ही प्रत्येक व्यक्ती असली पाहिजे. खरेदी केलेली वस्तू अथवा साहित्याची विक्री करता येईल अशाच वस्तू खरेदी करा. स्वत:ची बँकेत पत वाढेल असाच व्यवसाय निवडण्यात यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.खडसे यांनी, देशाच्या ग्रामीण व कृषी क्षेत्राच्या विकासात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे महत्वपुर्ण योगदान आहे. नाबार्डच्या माध्यमातून महिलांचे बचतगट तयार करुन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच उद्योगशील बनविण्याचे कार्य निश्चित कौतुकास्पद आहे. महिलांना वित्तिय साक्षर असणे काळाची गरज असल्याचे सांगितले. द्विवेदी यांनी, ग्रामीण भागातील नागरिकांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन जीवनस्तर सुधारावा व आर्थिक स्थिती बळकट करावी.प्रास्ताविकातून नाबार्डचे सहायक महाप्रबंधक मिलिंद कंगाली यांनी वित्तिय साक्षरता जागरुकता कार्यक्रमाची भूमिका विशद केली. महिलांनी पैशांची बचत नियमित करावी व व्यवसायाकडे वळावे. जीवन सुरक्षेच्या दृष्टिने महिलांनी विमा काढावा. विविध योजनांचा लाभ घेऊन भारत अभियानात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाला ढाकणी येथील बचतगटांतील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्हा समन्वयक टेटे, ग्रामपंचायत सदस्या सुनीता नागपूरे, शिक्षक बोरकर, ढाकणी विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव पटले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संचालन करून आभार पटले यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
पैशांचा विनियोग योग्यरित्या करा
By admin | Updated: July 17, 2015 01:22 IST