शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा
आमगाव : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार आहेत. ते पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वर्षांवरून ३५ वर्षे करण्यात यावी, अशी मागणी तयारी करीत असलेल्या बेरोजगार तरुणांनी केली आहे.
लक्ष लागले आता नुकसान भरपाईकडे
केशोरी : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या परतीच्या पावसाने आणि तुडतुडा, करपा, खोडकिडा या कीडरोगांनी खरीप हंगामातील धानपिकाची नासाडी झाली. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अपकृपेने हिरावून घेतला. कृषी विभागाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले आणि मदत मिळण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले आहेत. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईकडे लागले आहे.
रोजगार सेवकांना मानधन अत्यल्प
गोरेगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झटणारे रोजगार सेवक संकटात आहेत. लोकांच्या हाताला काम द्यावे म्हणून मनरेगांतर्गत काम उपलब्ध करून देण्यात त्यांची जबाबदारी आहे. मनरेगा कामाची जबाबदारी पार पाडणाऱ्या रोजगार सेवकांनाच अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे.
जिल्ह्यातील वनसंपदा आली धोक्यात
अर्जुनी-मोरगाव : नागझिरा अभयारण्य व वनविभाग परिसरात कोट्यवधी रुपयांची वनसंपदेची तस्करी केली जात असल्याची नागरिकांमधून ओरड होत आहे. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. याकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
घोगरा ते देव्हाडा रस्त्याची दुरवस्था
मुंडीकोटा : जवळील ग्राम घोगरा ते देव्हाडा रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, या रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. हा रस्ता अपघाताला आमंत्रण ठरत आहे. घोगरा ते देव्हाडा या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसत आहेत. गिट्टी व मुरूम उखडून बाहेर रस्त्याच्या कडेला पडलेला आहे. हा रस्ता पूर्णपणे जीर्ण अवस्थेत दिसत आहे.
एटीएममध्ये सुविधांचा अभाव
गोंदिया : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील एटीएममध्ये अनेक ठिकाणी गर्दी असल्याचे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी वॉचमन कार्यरत नसल्याने नागरिकांमध्ये धास्ती आहे.
नाल्यांअभावी सांडपाणी रस्त्यावर
गोंदिया : ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते झाले, मात्र पुरेशा नाल्या खोदल्या नाही. जेथे नाल्या खोदल्या, तेथील नाल्याही नागरिकांनी बुजवून टाकल्या. त्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहते.
शासन मंजूर करणार रेशन व केरोसीन परवाने
बोंडगाव : रेशन दुकाने व केरोसीनचे परवाने देण्यासाठी संबंधित गावातील ग्रामसभेचा ठराव आवश्यक होता. मात्र, आता ग्रामसभांच्या ठरावाशिवाय शासन परवाने मंजूर करणार आहे.
शेंडा परिसरात
नेटवर्कची समस्या
सडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम कन्हारपायली, शेंडा, आपकरीटोला, उशिखेडा, पाटीलटोला, लेंदिटोला, मोहघाटा, दल्ली यासह अन्य गावांत टॉवर नसल्याने ग्राहकांची अडचण होते.
शेतकरी वळले सौरपंप संयंत्राकडे
केशोरी : वीज वितरण कंपनीच्या भरमसाट दरवाढीमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या भरवशावर वीज बिल भरणे परवडणारे नाही. यामुळे या परिसरातील शेतकरी सौरपंप संयंत्र बसविण्याकडे वळत आहे.