गोंदिया : नक्षलवादाच्या बिमोडासाठी केंद्र व राज्य शासनाने जिल्ह्यात भारत बटालियन उभारली. मात्र या बटालियनच्या जवानांसाठी निवासस्थानाची सोय नसल्यामुळे या बटालियन मधील ६७५ जवानांना नागपूर येथे ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या बटालियनच्या वसाहतीसाठी शासनाने १३ कोटी रूपये मंजूर केले आहे.गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवण्याची शक्यता अधिक असते. जिल्ह्यातील बेरोजगारांना नक्षलवादी आपल्या चळवळीकडे ओढण्याचा प्रयत्न करतात. असे घडू नये म्हणून शासनाने सन २००९ मध्ये भारत राखील बटालियन २, राज्यराखीव पोलीस बल गट क्र.१५ बिरसी कॅम्प या नावाने ओळखले जाते. या बटालियनमध्ये ६७५ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यात ३५० युवक गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील आहेत. शासनाने ६७५ तरूणांना या बटालियनमध्ये २३ जानेवारी २०१० पासून रूजू केले. या बटालियन मधील जवानांचे १० महिन्याचे प्रशिक्षण पुणे जिल्ह्यातील दौंड येथे घेण्यात आले. या राज्य राखीव दलातील बल गट क्र. १२ हिंगोली येथे तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यात आले होते आता त्यांनाही नागपुरातच ठेवण्यात आले आहे. गोंदियाच्या बिरसी येथे या बटालियनच्या वसाहतीसाठी जागा पाहण्यात आली. वसाहतीची जागा दोन ठीकाणी आहे. परसवाडा नजीक व बिरसी येथे अश्या वेगवेगळ्या दोन ठीकाणी जागा असल्यामुळे पोलिस महासंचालकांनी त्या ठीकाणी वसाहत उभारण्यास मनाई केली होती. परंतु आता जागेचा तिढा सुटला. एकाच ठीकाणी वसाहत उभारले तर सोईस्कर होईल ही बाब ओळखल्याने जमीन पाहण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कोसे यांनी सांगितले. राहण्याची जागा नसल्यामुळे या बटालियन मधील जवानांना नागपूर येथे ठेवण्यात आले. गोंदियापासून नागपूरचे अंतर २५० किमी आहे. जिल्ह्यात एखादी घटना घडल्यास त्या जवानांना येण्यासाठी बराच वेळ वाया जाईल. भारत बटालियनच्या जवानांच्या वसाहतीसाठी १५० एकर जागा गोंदियापासून १८ किमी अंतरावर आहे. शासनाने शासनाने या भारत बटालियनसाठी १३ कोटी रूपये मंजूर केले आहे. लवकरच या वसाहतीचे बांधकाम सुरू होणार असल्याचे दोन वर्षापुर्वी पोलीस अधीक्षक कोसे यांनी सांगितले होते. परंतु आताही या जवानांना नागपूर येथेच ठेवण्यात आले आहे. नक्षलग्रस्त भागासाठी शासनाने विशेष महानिरीक्षक गडचिरोली परीक्षेत्र गडचिरोली यांचे पद निर्माण केले. मात्र हे कार्यालय देखील नागपूरला आहे. गु्रप १३ हे वडसा-गडचिरोली करीता तयार करण्यात आले. परंतु हे कार्यालय देखील १९९३ पासून नागपूर येथेच आहे. (तालुका प्रतिनिधी)
दोन वर्षांपासून भारत बटालियन नागपुरातच
By admin | Updated: August 9, 2014 00:55 IST