गोंदिया : सन २००९ मध्ये करण्यात आलेल्या कारवाईतील लाचखोर तलाठ्यास न्यायालयाने २७ फेब्रुवारी रोजी दोन वर्षांची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तिरोडा तालुक्यातील इंदोर खुर्द येथील हे प्रकरण आहे. सविस्तर असे की, तक्रारदाराच्या आईच्या नावावर असलेल्या शेतातील विहीर व झाडांची सात-बारावर नोंद घेऊन कागदपत्र तयार करून देण्यासाठी इंदोरा खुर्दचे तलाठी आरोपी तुळशीराम पांडूरंग जांभूळकर (५४) यांनी ५०० रूपयांची मागणी केली होती. तक्रारीच्या आधारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २९ जून २००९ रोजी सापळा रचून जांभूळकर यांनी लाच घेताना रंगेहात पकडले होते. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७,१३(१)(ड) सहकलम १३(२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. तत्कालीन सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक मुंडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. दरम्यान २७ फेब्रुवारी रोजी विशेष न्यायाधीश आर.जी.अस्मार यांनी आरोपी जांभूळकर यांना कलम ७ अंतर्गत दोन वर्षांची कैद व एक हजार रूपये दंड तसेच कलम १३(१)(ड) अंतर्गत दोन वर्षांची कैद व एक हजार रूपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली. वरिल दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्र भोगायच्या आहेत. (शहर प्रतिनिधी)
लाचखोर तलाठ्यास दोन वर्षांची शिक्षा
By admin | Updated: February 28, 2015 01:04 IST