स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : आरोपी भंडारा एलसीबीच्या स्वाधीनगोंदिया : गोंदिया, तिरोडा, रेल्वे बरोबर गोंदिया व भंडारा जिल्ह्यात चोरी, घरफोडी, जबरीचोरी व खुनाच्या प्रकरणात सराईत असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आमगाव येथील बसस्थानकावरुन अटक केली. सदर आरोपी भंडाराच्या वरठी येथील एका डॉक्टरकडे चोरी करुन आमगावला आले होते. ही कारवाई शनिवारी दुपारी ४ वाजता करण्यात आली. अजय ताराचंद कनोजे (२१)व सुबोध मिलिंद कांबळे (२६) रा. शास्त्रीय वॉर्ड वरठी (भंडारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस अधीक्षक राकेशचंद्र कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गरजे, हवालदार भूमेश्वर जगनाडे, निलू बैस, जितेंद्र मिश्रा, सुजित जाधव, विनय शेंडे व वाहन चालक शेंडे हे गुन्हे प्रतिबंधक, पेट्रोलिंग करीत असताना आमगावच्या बसस्थानकावर सदर आरोपी संशयास्पद स्थितीत दिसले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता त्यांनी पोलिसांना समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.चौकशी करताना त्यांनी वरठी येथील डॉ. रहांगडाले यांच्या घरुन चोरी केल्याची कबूली दिली. यावर स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाच्या पोलिसांनी भंडाराच्या स्थानिक गुन्हे शाखेला पाचारण करून सदर आरोपींना त्यांच्या स्वाधीन केले. गोंदिया व भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदर आरोपींजवळून डॉ. रहांगडाले यांच्या घरुन पळविलेले दीड लाखाचे दागिणे हस्तगत केल्याचे समजते. या आरोपींनी ज्या घरुन चोरी केली त्या घटनेसंदर्भात वरठी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५१/१७ चे भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केले आहे. अजय कनोजे याच्यावर गोंदिया शहरात चोरीचा गुन्हा, तिरोडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा, गोंदिया रेल्वे पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे, तसेच जिल्ह्याभरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. भंडारा जिल्ह्यातही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)बसौर गँगच्या दोन सदस्यांना १५ पर्यंत पीसीआर देशाच्या प्रत्येक राज्यात चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या बसौर गँगच्या दोन सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्या आरोपींना तिरोडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तिरोडा न्यायालयाने या आरोपींना १५ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जिल्ह्याच्या तिरोडा व डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत प्रत्येकी एक अश्या दोन चोऱ्या या टोळीच्या सदस्यांनी केल्या आहेत. तिरोडा तालुक्याच्या काचेवानी येथील सुमेश किसन सयाम (३५) यांच्या घरून ९९ ग्रॅम सोन्याचे दागिणे किंमत १ लाख ४८ हजार ५०० रुपये तर ६१ तोळा चांदीचे दागिणे किंमत १२ हजार २०० रुपये असा एकूण १ लाख ६० हजार ७०० रुपयाचा ऐवज तर डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढरी येथील श्यामलाल बाबुलाल पटले (५५) यांच्या घरून २८ मार्चच्या रात्री दरम्यान १ लाख १० हजार व सोन्या-चांदीचे दागिणे पळवून नेले होते. अटक करण्यात आलेल्या मदन नंदकुमार बसौर (३८) व रामसागर शितल बसौर (३५) रा. लामीदाह ता. जि. सिंगरोली ( मध्यप्रदेश) यांच्याकडून पोलीस कोठडीत कुठे-कुठे चोरी केली याची माहिती घेण्यात येणार आहे.
घरफोडीतील दोन सराईत गुन्हेगारांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 01:12 IST