लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शुक्रवारी नवीन बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने जिल्हावासीयांना थोडाफार दिलासा मिळाला होता. त्यातच शनिवारी (दि.२९) जिल्ह्यात १८० नवीन बाधितांची भर पडली असताना ३५४ बाधितांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. एकंदर बाधितांपेक्षा मात करणारे दुप्पट असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात येत असताना दिसत आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पडसाद दिसत असून, जिल्ह्यातही झपाट्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. नववर्षाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, मागील काही दिवसांपासून २००-३०० च्या घरात बाधितांची नोंद घेतली जात आहे. त्यातच मृतांची संख्याही वाढू लागल्याने जिल्हावासीयांचे टेन्शन वाढले होते. मात्र, शुक्रवारी (दि. २८) जिल्ह्यात १६९ नवीन बाधितांची नोंद घेण्यात आली असतानाच २१० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे दिसले. तर शनिवारी सुद्धा (दि.२९) जिल्ह्यात १८० नवीन बाधितांची भर पडली असतानाच तब्बल ३५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. म्हणजेच, बाधितांपेक्षा मात करणारे जास्त असल्याने जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात येत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, जिल्ह्यात गोंदिया तालुका सुरुवातीपासूनच हॉटस्पॉट असून, सर्वाधिक ४७४ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे; मात्र दिलासादायक बाब म्हणजे, तालुक्यातील बाधितांची संख्या हजारच्या घरात गेली होती. मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या घटत असल्याचे दिसत आहे.
नियमांचे पालन अत्यावश्यक
- सध्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच तेवढ्याच गतीने रुग्ण बरे होताना दिसत आहे. ॲक्टिव्ह रुग्णांपैकी मोजकेच रुग्ण भरती होत असून त्यांनाही गंभीर लक्षणे नाहीत. नेमकी हीच बाब हेरून जिल्हावासीय तिसऱ्या लाटेला अगदी हलक्यात घेताना दिसत आहेत. मास्क न लावता फिरण्याचा प्रकार सुरूच आहे. शिवाय गर्दी टाळण्याची गरज असतानाच गर्दी होत आहे.
मृतांची संख्या पोहोचली ५८३ पर्यंत- तिसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र गंभीर बाब म्हणजे, बाधितांची संख्या वाढत असतानाच मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. जानेवारी महिन्यातील आकडेवारी बघितल्यास ३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यानंतर मृतांचा आकडा ५८३ पर्यंत पोहोचला आहे.