गोंदिया : पावसाचे पाणी अडून राहू नये यासाठी नगर परिषदेने मान्सून पूर्व सफाई अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत शहरातील मोठय़ा नाल्यांची मशीनच्या माध्यमातून सफाई केली जात आहे. मात्र सांडपाणी वाहून घेणार्या लहान नाल्या अद्यापही तुंबून आहेत. यामुळे पालिकेचे सफाई अभियान फक्त मोठय़ नाल्यांसाठीच काय असा प्रश्न पडत असून अभियान फसल्याचे दिसून येते. तर या नाल्यांची सफाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी शहरवासी करीत आहेत. नगर पालिकेने शहरातील मरारटोली परिसरातील मोठय़ा नाल्यांची पोकलँडच्या माध्यमातून सफाई करायला सुरूवात केली. मान्सून पूर्व सफाई अभियान सुरू झाल्याचे सांगत पालिकेच्या पदाधिकारी व सदस्यांनी फोटो काढून घेतले. झाले ते झाले मात्र या मोठय़ा नाल्यांव्यतिरीक्त शहरात अन्य नाल्या आहेत याबाबत मात्र पालिकेला विसर पडल्याचे दिसते. कारण मोठे नालेच पाणी वाहून नेत नसून लहान नाल्यांची सफाई करणेही तेवढेच गरजेचे आहे. असे असतानाही शहरातील नाल्या मात्र सांडपाणी व कचर्याने तुंबलेल्या आहेत. शहरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी या नाल्या महत्वपूर्ण आहेत. असे असतानाही मात्र कित्येकांनी आपल्या स्वार्थासाठी या नाल्यांवर अतिक्रमण केले आहे. तर घरातला कचरा थेट नाल्यांत टाकला जात असल्याने सांडपाणी व कचरा यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. या नाल्यांवरील अतिक्रमण सफाई कर्मचार्यांसाठी डोकेदुखी ठरत असून त्यामुळेच सफाई होत नाही. असे असतानाही मात्र पालिकेकडून असे अतिक्रमण काढणे होत नसल्याचे चित्र आहे. पालिकेच्या या कारभारामुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागतो. मान्सून आता जेमतेम १५ दिवसांवर असून शहरातल्या नाल्यांची सफाई झालेली नाही. अशात पावसाने हजेरी लावल्यास पालिका मात्र हात वर करून तमाशा बघण्याचे काम करणार. मान्सून पूर्व सफाई अभियानाच्या नावावर पदाधिकारी व सदस्य आपले फोटो काढून घेत आहेत. मात्र खर्या अर्थाने हे कितपत योग्य आहे याबाबत त्यांनीच मंथन करणे गरजेचे आहे. पोकलँडच्या माध्यमातून मोठय़ा नाल्यांची सफाई करणे योग्य आहे. मात्र सफाई कामगारांच्या माध्यमातून शहरातील अन्य नाल्यांची सफाई करणे तेवढेच महत्वाचे आहे. अन्यथा या पावसाळ्य़ातही निकासी अभावी पाणी शहरवासीयांच्या घरात शिरणार यात काही शंकाच नाही. (शहर प्रतिनिधी)
सफाईअभावी तुंबल्या गोंदिया शहरातील नाल्या
By admin | Updated: May 22, 2014 01:14 IST