गोरेगाव : अचानकपणे उद्भवणार्या नैसर्गिक संकटात आपदग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी व त्यांच्या पूनर्वसनासाठी येथील तहसीलदार कार्यालयाकडून बचाव पथकांना प्रशिक्षण देण्यात आले. स्थानिक कटंगी जलाशयात गोरेगावचे तहसीलदार डी.ए.सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच, नायब तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत बचाव पथकाला प्रशिक्षण देण्यात आले. त्यात पाण्यात पोहणे, पाण्यात बुडणार्या व्यक्तीला सहीसलामत बाहेर काढणे, पुरांनी वेढलेल्या नागरिकांना बाहेर काढणे इत्यादी प्रशिक्षण दिल्याचे तहसीलदार सपाटे यांनी सांगीतले. नैसर्गिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावनिहाय बचाव पथक तयार करण्यात आले आहे. एका बचाव पथकात १२ व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. या बचाव पथकांच्या माध्यमातून नैसर्गिक संकटाचे निवारण, मदतकार्य, सुव्यवस्थितपणे हाताळता येणार आहे. शासनाने पोलीस विभाग, लघुपाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामीण रुग्णालय, कृषी विभाग, वनविभाग महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, दुरसंचार विभाग या सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणांकडे पुरासंबंधी व नियोजनासंदर्भात कामे सोपविलेली आहेत.दरवर्षी पावसाळ्यात नद्यांना पूर येऊन अचानक एखादी आपत्ती ओढवते. गावांना पाण्याचा वेढा पडू शकतो किंवा लोक पुराच्या पाण्यात अडकून पडून शकतात. अशावेळी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
आपत्ती निवारणासाठी बचाव पथकांना प्रशिक्षण
By admin | Updated: June 6, 2014 00:03 IST