गोंदिया : शहरातील ५० वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले रस्ते आजही जसेच्या तसेच आहेत. पूर्वीच्या तुलनेपेक्षा १० पटीने लोकसंख्या वाढली, मात्र रस्त्यांची रूंदी न वाढता उलट या रस्त्यावर व्यापाऱ्यांचे अतिक्रमण झाले. यामुळे गोंदिया शहरातील रस्ते नेहमीच वाहतुकीच्या कोंडीत अडकले असतात. यातच बेवारस जनावरे रस्त्यावर राहात असून बेशिस्त असलेले वाहनचालक वाटेल त्या ठिकाणी पार्र्कींग करीत असल्याने शहरातील वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आले.शहरातील रस्ते आधीच अरूंद आहेत. त्यातच या रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. सोबतच साहित्य विकणारे ठेलेवाले या रस्त्यावर आपली अधिसत्ता गाजवतात. वाट्टेल त्या ठिकाणी ठेले उभे करून व्यवसाय करतात. शहरातील नागरिकांनाही कोणतीही शिस्त नाही. मार्केट परिसरात येणारे वाहन चालक आपले वाहन शिस्तीने लावून ठेवण्यापेक्षा कोणत्याही ठिकाणी उभे करुन खुशाल खरेदी करतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी बेशिस्तपणे वागणारे वाहन चालक, व्यापारी पोलिसांंना दोष देत मोकळे होतात. परंतु रस्त्यावर आपण केलेल्या अतिक्रमणाला पोलिसांनी किंवा नगरपरिषदेने हटवू नये, हा त्यांचा आग्रह असतो. या व्यापाऱ्यांच्या आग्रहाला काही लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याने गोंदिया शहरातील अरूंद रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. अनेक नागरिक आपल्या घरी गाई-म्हशी पाळतात. परंतु त्या जनावरांना चरण्यासाठी न पाठवता बेवारस सोडून देतात. परिणामी ही जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसतात. ही जनावरे वाहतूक खोळंबविण्यासाठी कारणीभूत ठरतात. नगर परिषदेने या जनावरांंचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला. मात्र तो अपयशी ठरला. कारण नगर परिषदेकडे कोंडवाडाच नसल्याने कारवाई करण्यात आलेल्या जनावरांंना ठेवणार कुठे, हा प्रश्न नगरपरिषदेला पडतो. त्या जनावरांचा चारा पाणी कसे करणार हाही प्रश्न उद्भवतो. परिणामी नगर परिषद या बेवारस जनावरावर कारवाई करीत नाही. आता नगर परिषदेने कोंडवाड्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्या संदर्भात ठराव देखील घेण्यात आला आहे. या रस्त्यावर होर्डिंगचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे. नगर परिषदेने ठरावीक जागी होर्डिंग लावण्याची परवानगी दिली. परंतु गोंदिया शहरात वाटेल त्या ठिकाणी होर्डिंग लावून शहराचे विद्रूपीकरण करण्यात आले आहे. अनेक लोक नगरपरिषदेला सूचना न देता किंवा परवानगी न घेता आपल्या मनाप्रमाणे वाटेल त्या ठिकाणी होर्डिंग लावून शहराला विद्रूप करीत आहेत. या संदर्भात नगर परिषदेने होर्डींग जप्त व दंडाची कारवाई देखील केली आहे. शहरातील अरूंद रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मात्र हे अतिक्रमण न काढण्यासाठी लोकप्रतिनिधीच दबाव आणत असल्याचे नेहमी बोलले जाते. शहरातील विस्कळीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस जयस्तंभ चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय, फुलचूर नाका, कुडवा नाका, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, शक्ती चौक, मरारटोली, गांधी प्रतिमा ते गोरेलाल चौक, काळी-पिवळी स्टॅन्ड, नेहरू चौक, पाल चौक येथे पार्इंट नेमण्यात आले. दररोज वाहतूक पोलीस वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतात. याशिवाय दोन मार्शल वाहन व एक गस्ती पथक वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात. परंतु शहरात येणाऱ्या लोकांची संख्या अधिक व अरूंद रस्त्यांवर अस्ताव्यस्त पार्र्किंगमुळे वाहतुकीची समस्या होते. (तालुका प्रतिनिधी)
जनावरे व पार्किंगमुळे वाहतूक विस्कळीत
By admin | Updated: November 1, 2014 01:57 IST