बोंडगावदेवी : रेती वाहून नेण्याचा परवाना नसताना ट्रॅक्टरमध्ये रेती भरुन वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडवून पोलिसांनी जप्तीची कारवाई सोमवारी केली . घटनास्थळावरुन ट्रॅक्टर चालक फरार झाला. रेती भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह पोलिसांनी पोलीस स्टेशनला जमा केला आहे.
प्राप्त माहितीनुसार लाखांदूरवरुन अर्जुनी-मोरगावकडे कोणताही परवाना नसताना रेती भरुन ट्रॅक्टर येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने ठाण्यातील पोलीस शिपाई मोहन कुहीकर, प्रवीण बेहरे, विजय कोटांगले धाबेटेकडी येथे गस्त घालत होते. रेती भरलेला ट्रॅक्टर अर्जुनी मोरगावकडे येत असताना त्याला थांबविण्याचा इशारा देण्यात आला. ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टर थांबवून तिथून पळ काढला. ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती भरलेली आढळून आली. पंचासमक्ष जप्तीची कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरुन चालक, मालक पळून गेल्यानेे धाबेटेकडी येथील सुभाष डोंगरवार यांनी ट्रॅक्टर चालवून पोलीस स्टेशनमध्ये जमा केला. रेती वाहतूक करण्याचा कोणताही परवाना नसताना ट्रॅक्टरमध्ये अवैधपणे रेती वाहून नेल्याच्या आरोपावरुन अर्जुनी-मोरगाव पोलीस स्टेशन येथे कलम ३७९ भादंवि सहकलम ५०/१७७, १७९ मोवाका अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांच्या मार्गदर्शनाखाली तपाशी अधिकारी नापोशि विजय कोटांगले पुढील तपास करीत आहेत.