गोंदिया : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारपासून (दि.२) ‘स्वच्छ भारत मिशन’ या अभियानाला सुरुवात करण्यात येत आहे. त्यानिमित्त जिल्हा परिषद, पंचायत समितीसह जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायत कार्यालयात स्वच्छतेची शपथ घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेतील २३ विभागातील एकूण ३३९ कर्मचारी शपथ घेतल्यानंतर प्रत्यक्षात श्रमदान करुन कार्यालय व परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबविणार असल्याची माहिती देवून स्वच्छता अभियानाला जनआंदोलन बनविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे यांनी केले आहे.केंद्र व राज्य शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशप्रमाणे ‘मिशन स्वच्छ भारत’ कार्यक्रम सुरू होत आहे. २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण देशाला निर्मल करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे गांभिर्य गावस्तरापासून राज्यस्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी २५ सप्टेंबर ते २३ आॅक्टोबर २०१४ पर्यंत राष्ट्रीय स्वच्छता अभियान देखील राबविण्याचे निर्देश आहेत. ग्रामीण भागात आजही स्वच्छतेच्या पुरेशा सोयी नाहीत. बहुतेक व्यक्ती हे उघड्यावरच शौचास जातात. परिणामी विष्ठेतील विषाणू, जीवाणू , परजीवी जंतूमुळे पोलिओ, अतिसार, कॉलरा, हगवन, विषमज्वर असे विविध आजार जडतात. केवळ व्यक्तीक स्वच्छता पाळल्यास आपणव स्वत:सह अनेक व्यक्तींचा या आजारापासून बचाव करू शकतो. शौचालय बांधणे, त्याचा वापर करणे, स्वयंपाकापूर्वी, जेवणापूर्वी शौचाहून आल्यानंतर, बाळाची शी धुतल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुणे, पिण्याचे पाणी उंचावर ठेवून ते घेण्यासाठी ओगराळ्याचा वापर करणे, अन्न सुरक्षित झाकून ठेवणे या स्वच्छतेच्या बाबी अतिशय छोट्या आहेत. मात्र, त्याचा आपल्या वैयक्तीक आयुष्यात अंगिकार केल्यास त्यामुळे आपण आपले घरच नव्हे तर परिसर आणि पर्यायाने आपला गाव स्वच्छ ठेवू शकतो. अनेक कार्यालयात तंबाखू, गुटखा, पान खावून भिंतीवर थुंकले जाते. ही सवय अतिश्य वाईट आहे. आपण आपल्या घरी असा प्रकार करीत नाही. आपले कार्यालय, आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक व्यक्तीचे आद्य कर्तव्य असून स्वच्छता राखून आपण एकप्रकारे देश्सेवाच करीत आहोत. याचे भान प्रत्येक व्यक्तीने ठेवावयास पाहिजे. जिल्हा परिषदेत स्वच्छता राखण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. सर्व कर्मचारी उद्या (दि.२) सकाळी साडे सात वाजता कार्यालयात उपस्थित राहून स्वच्छतेची शपथ घेतली. त्यानंतर परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान करतील. हआच उपक्रम जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती तथा ग्रामपंचायतीत सुद्धा राबविण्यात येणार आहे. ग्रामसभेत अशी शपथ घेण्याचे निर्देश देण्यात आले असून नागरिकांनी सुद्धा या उपक्रमात व्हावे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)
५५६ ग्रामपंचायतीत आज स्वच्छतेची शपथ
By admin | Updated: October 1, 2014 23:24 IST