काचेवानी : जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या वतीने तिरोडा तालुक्यातील १३९ गावांपैकी केवळ २० गावांत डासनाशक फवारणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. इतर गावातही अशी फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जिल्हा हिवताप विभागाने सदर मोहीम १४ जून २०१४ पासून सुरू केली असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात ७२ मजूर कार्यरत असून १२ तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. तिरोडा तालुक्यात तीन गट कार्यरत आहेत. यातील एस.आर. मानकर, दिलीप इंदुरकर आणि ए.बी. मानकर हे तीन गटप्रमुख असून प्रत्येक गटात सहा मजूर कार्यरत आहेत. तालुक्यातील सुकडी, चिखली, डोंगरगाव, काचेवानी, विहीरगाव, मारेगाव, कोडेलोहारा, मंगेझरी, कोडेबर्रा, गोविंदपूर आणि बोदलकसा अशा २० गावांत फवारणीचे कार्य होत आहे. परंतु तालुक्यात एकूण १३९ गावे असून केवळ २० गावांत फवारणी करणे म्हणजे ठिठोल्या करण्याचे प्रकार असल्याचे दिसत आहे.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सलीम पाटील यांनी सांगितले की, फवारणीसाठी गावांची निवड पुणेवरून होत असते. ज्या गावांत डासांचे प्रमाण अधिक दिसून येथे किंवा डासांच्या प्रभावातून प्रकरणे आढळतात अशा गावांत फवारणी करण्याचे ठरविले जाते व त्यासाठी मंजुरी पुणेवरून येते.केवळ तिरोडा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच डासांचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. त्यामुळे डास प्रतिबंधक फवारणी लहान-मोठ्या सर्वच गावात होणे गरजेचे आहे. तिरोड्याचे आ. विजय रहांगडाले यांचे गृहगाव खमारी आणि माजी आ. दिलीप बंसोड यांचे गृहगाव ठाणेगाव सुद्धा वगळण्यात आले आहेत. या व्यतिरीक्त बेरडीपार, निमगाव, इंदोरा, बरबसपुरा, जमुनिया, मेंदीपूर, अर्जुनी, परसवाडा, मुंडीकोटा, वडेगाव सहित महत्वाची ५० पेक्षा अधिक गावे सोडण्यात आली आहेत. २० गावांत फवारणी सुरू असताना आपल्याही गावात फवारणी होणार याची नागरिक वाट बघत आहेत. मात्र २० गावाव्यतिरीक्त अन्य गावांत फवारणी होवू शकत नाही. परंतु अन्य गावात फवारणी झाली नसल्याने व तेथे रुग्ण आढळल्यास हिवताप अधिकाऱ्यांना गंभीर स्वरूपाचा सामना करावा लागेल, नागरिक बोलून दाखवित आहेत. सध्या फवारणीचे काम काचेवानी ग्रा.पं. मध्ये सुरू आहे. एस.आर. मानकर यांच्या चमूमध्ये देवरीचे एन.एम. शेंदरे, हिरापूरचे पी.एम. मेश्राम, मानेगावचे एम.एम. पटले, टी.एन. भोयर आणि बी.एस. प्रधान आदी मजूर कार्यरत आहेत. यांची भेट घेतली असता हे कार्यक्रम जून महिन्यापासून सुरू असून तालुक्यात ठराविक गावे असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रम ६ डिसेंबरपर्यंत असल्याचे सांगितले. मात्र अधिकाऱ्यांनी काम दिल्यास आपण करणार, असे ते बोलले. या कामात अडचणींबात विचारले असता, थंडीच्या वेळी राहण्याची गैरसोय होत आहे. कार्यरत मजूर रोजंदारीवर असून एका दिवशी ५०० लोकसंख्या असलेल्या घरांमध्ये फवारणी ठरवून दिल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
तिरोडा तालुक्यात २० गावांत डासनाशक फवारणी सुरू
By admin | Updated: November 27, 2014 23:37 IST